शासकीय फिर्याद होण्यास पंचायत समिती अधिकार्यांची ‘ना’ ; अधिकार्यांवर राजकीय दबावाची चर्चा ; मुख्याध्यापकांना कारणे दाखवा
फैजपूर- भालोद न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय पोषण आहाराच्या तांदळाची भरलेली रीक्षा शाळेबाहेर जात असताना जागृत ग्रामस्थांनी ती अडवल्याची घटना 2 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी संध्याकाळी घडली होती. भालोद येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार हरीभाऊ जावळे असून अद्याप पर्यंत या चोरीच्या पोषण आहारासंदर्भात गुन्हा दाखल नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तक्रार देण्यास पंचायत समिती अधिकारी यांची टाळाटाळ दिसून येत असल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पथकाने केलेल्या तपासणीनुसार सुमारे सव्वादोन क्विंटल तांदूळ भरल्याने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आमदारांच्या शाळेतील प्रकाराने खळबळ
जिल्ह्यात आधीच विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न गाजत असतांना भालोद येथील आमदार हरीभाऊ जावळे संस्थेचे अध्यक्ष असलेल्या संस्थेत विद्यार्थ्यांच्या तोंडाचा घास हिसकावणारी घटना घडली आहे. रीक्षा (एम.एच 19 ए एक्स 9890) द्वारे शुक्रवार, 2ोजी शुक्रवारी संध्याकाळी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोनशे किलोचा तांदूळ बाहेर पडत असताना सतर्क ग्रामस्थांनी रीक्षा अडवली आणि पोलीस स्टेशनला माहिती दिली मात्र यात संबंधित आरोपींवर पंचायत समिती अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी वर हात करत असल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव येत तर नाही ना ? अशी शंका उपस्थित होत आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठलाही गुन्हा फैजपूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदारांच्या संस्थेत पोषण आहार चोरी होणे ही लाजीरवाणी बाब -रवींद्र पाटील
ज्या विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्यात आली ती संस्था आमदार हरीभाऊ जावळेंची आहे. पोषण आहार चोरीला गेला व ही बाब उघडकीस आली म्हणून नागरीकांनीच तक्रार दाखल करावी ही बाब चुकीची आहे. यात शासकीय अधिकारी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करू शकतात. मी शिक्षण समिती सदस्य असल्याने हे निंदनीय बाब सभेत मांडणार आहेच तर सर्वसाधारण सभेत या विषयी आवाज उठवणार आहे. यातील मुख्य दोषींवर कारवाई झाली नाही तर मी जिल्हा परीषदेसमोर उपोषणाला बसेल. अधिकारी आमदारांच्या दाबाखाली जर लोकशाहीत कामकाज करत असतील तर ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब म्हणावी लागेल, असे शालेय शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील म्हणाले.