नियोजन पुर्व बैठकीत प्रांताधिकार्यांचे आदेश
आळंदी : आळंदी कार्तिकी यात्रेत राज्य परिसरातून आलेल्या भाविकांसह नागरिकांना नागरी सेवा सुविधांसह सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आदेश नियोजन पूर्व आढावा बैठकीत खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी प्रशासनास दिले. माऊंलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत खेडचे प्रांत आयुष प्रसाद बोलत होते. या बैठकीस तहसीलदार सुचित्रा आमले, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, पोलीस सह.आयुक्त असलटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, यात्रा समिती सभापती पारुबाई तापकीर, चर्होलीच्या सरपंच अश्विनी सस्ते, संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, नगरसेविका शैला तापकीर, प्रतिभा गोगावले, सुनीता रंधवे, स्नेहल कुर्हाडे, नगरसेवक आदित्य घुंडरे, प्रशांत कुर्हाडे, तुषार घुंडरे, पांडुरंग वहिले, सागर भोसले, मंडलाधिकारी चेतन चासकर तसेच अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवारी अंतिम आढावा बैठक
या बैठकीत नियोजन पूर्व आढावा घेण्यात आला. शासकीय खात्यांनी केलेल्या तयारीची माहिती जाणून घेत प्रांत प्रसाद यांनी सेवा सुविधा यात्रा नियोजनास सूचना करीत कारवाईचे आदेश दिले. 26 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात येथील दर्शनबारीसह यात्रेच्या तयारीचा अंतिम आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर आळंदीत झालेल्या कामाची पाहणी करण्यात येणार असल्याचे प्रांत प्रसाद यांनी सांगितले. आळंदी यात्रेत सुविधा देण्यास प्राधान्य देण्याचे आदेश देत वेळ प्रसंगी कारवाईचे आदेश त्यांनी दिले. आळंदीत स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, टँकर व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, यात्री निवार्या बाबत चर्चा झाली. पोलीस कर्मचार्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी नगरपरिषदेने घेण्याचे आवाहन करण्यात आले. पास व्यवस्था, वाहनांवर कारवाई, मध्यवर्ती नियंत्रण कक्ष, स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था, खड्डे, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, शहरात आरोग्य विषयक तपासणी, लॉज, धर्मशाळा हॉटेल तपासणी, तसेच राहण्याचे ठिकाणी ओळखपत्रानेच प्रवेश देण्याचे आदेश यावेळी प्रांत प्रसाद यांनी दिले. सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, प्रवास व्यवस्था स्वतंत्र आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण विरोधी पथक, घातपात विरोधी पथक, मॉकड्री प्रात्याक्षिक आदींवर नियोजन प्रमाणे काम करण्यास यावेळी त्यांनी सांगितले.
भाविकांसाठी 435 एकर जागा उपलब्ध
यावेळी नगराध्यक्षा उमरगेकर यांनी विकास आराखड्यातून केलेली स्वच्छतागृहे यात्रा काळात भाविकांना तसेच नागरिकांना मोफत वापरास उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शाळा भाविकांना वापरण्यास देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक संतोष गावडे यांनी महाद्वारातील गर्दीवर नियंत्रणासाठी दक्षता घेण्याची मागणी केली. तर प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे म्हणाले की, यात्रा काळात सर्वांनी सुसंवाद ठेवण्याची गरज आहे. आळंदी संस्थानने 435 एकर जागा भाविकांच्या वापरास खुली केली असल्याचे त्यांनी सांगितले.