भीमा कोरेगाव दंगल : भिडेंविरोधात सकृतदर्शनी पुरावा नाही : फडणवीस
चौकशी बंद केली नाही, चौकशी सुरुच राहील : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
भिडेंविरोधात दिलेले पुरावे सभागृहात सादर करा : आंबेडकरांनी ठणकावले
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी या दंगलीतील प्रमुख आरोपी संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीनचिट दिली आहे. याबाबतची माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली. संभाजी भिडे यांच्याविरोधात अद्याप एकही सकृतदर्शनी पुरावा मिळालेला नाही. मात्र, त्यांची चौकशी बंद केलेली नाही. यापुढेही त्यांची चौकशी सुरुच राहील तसेच फेसबूक पोस्टची चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेबाबत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. भिडे यांचा या हिंसाचारात प्रत्यक्ष हात नसला तरी, त्यांच्या चिथावणीमुळेच ही दंगल घडली आहे. भिडे यांच्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणी हिंसाचार उसळला, तसेच दगडफेक करणारे संभाजी भिडे यांच्या घोषणा देत होते. त्यामुळे या प्रकरणी भिडे यांची चौकशी व्हावी, हीच आमची मागणी राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पुरावे दिले होते, ते पुरावे त्यांनी सभागृहात सादर करावे, असे आव्हानही अॅड. आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे.
भिडेंविरोधात पुरावा नसल्याचा फडणवीसांचा दावा
संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी राज्यभरातील 260हून अधिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सोमवारी एल्गार मोर्चा काढला होता. यानंतर हे प्रकरण विधिमंडळातही चांगलेच गाजले. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांना क्लीनचिट दिली. फडणवीस म्हणाले, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एका महिलेने संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना दगडफेक करताना पाहिल्याचे सांगितल्याने तक्रार नोंदविण्यात आली. मात्र, भिडे यांचा यात कुठल्याही प्रकारचा सहभाग असल्याचे अद्याप तपासात समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. मात्र, त्यांची यापुढेही चौकशी केली जाईल. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात रावसाहेब पाटील नावाच्या एका व्यक्तीने दंगलीबाबत वादग्रस्त पोस्टबूक पोस्ट केली होती. ती आमच्याकडे दिली होती. त्याबाबत चौकशी करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिस तपासात आजपर्यंत जेवढे पुरावे हाती आले आहेत, त्यात भिडे यांच्याविरोधात एकही पुरावा नाही, किंवा त्यांचा दंगलीत सहभाग होता हे स्पष्ट होत नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी भिडे गुरुजींना क्लीनचिट दिली आहे.
मुख्यमंत्री चुकीची माहिती देत आहेत. आम्ही संभाजी भिडे यांनी दंगलीत प्रत्यक्ष सहभाग घेतला असे कधीही म्हणालो नाही. मात्र, या घटनेचे ते एक सूत्रधार आहेत, असे आमचे म्हणणे आहे. याबाबतचे फोटो, व्हिडिओसह इतर पुरावे पोलिस व सरकार दरबारी दिले आहेत. ज्या लोकांनी हल्ला केला त्यांनी काही संघटनांची, व्यक्तींची नावे घेतली आहेत. त्यामुळे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांनी भीमा कोरेगाव दंगलीचा कट रचला गेल्याचे आमचे म्हणणे आहे व त्याबाबतचे पुरावे सादर केले आहेत.
– अॅड. प्रकाश आंबेडकर, नेते भारिप-बमसं
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे व एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात भिडेंविरोधात कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. तक्रार करणार्या महिलेचा महानगर दंडाधिकार्यांसमोर इन कॅमेरा जबाब घेण्यात आला. तिनेदेखील भिडेंना तिथे प्रत्यक्ष पाहिले नाही, मात्र स्थानिक जी चर्चा करत होते त्यात संभाजी भिडेंच्या नावाचा उल्लेख केला जात होता म्हणून तक्रारीत त्यांचे नाव सांगितले, असे जबाबात सांगितले. भिडे व त्यांच्यासोबतचे आठ ते दहा लोकं आहेत त्यांचे मोबाईल लोकेशन त्या भागातील नाही. या घडामोडीनंतरही सरकारने चौकशी बंद केलेली नाही. सखोल चौकशी करू व संबंधितांवर कठोर कारवाई करु.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री