सोशल मीडिया: जमात एकच मात्र विचार भिन्न-भिन्न !

0

आजकाल भडक लिखान करून डीएसएलआर कॅमेऱ्यातून एडिट केलेला फोटो टाकला की अवघ सोशल मीडिया त्यावर “एकदाच घुसणार, भगवाच दिसणार,” “राडा करणारा पक्या”, “आमचं काळीज”, “दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस”, अशा शब्दांनी तुटून पडतं..!!

त्याच सोशल मीडियावर एक अशी जमात आहे जी त्यांना नावं ठेवायला सरसावलेली असतेय..’ते ना तसलंच हाय’, ‘नुसतं फोटो टाकत असतंय,’ , ‘नुसत्या पोस्ट टाकत असतंय’. बरं ते ह्याचे दररोज फोटो पाहतायत म्हणजे त्यांचाही वापर जवळपास तेवढाच..!!

बरं टाकले त्याने फोटो, केल्या त्याने फालतू पोस्ट..!! त्याला बोलण्याअगोदर तुम्ही हे का झालं असेल त्याचा कधी सखोल विचार केला? तुमच्या काळात फोन नव्हते किंबहुना होते तरी न परवडणाऱ्या किमती. घेतला तरी एखाद्यकडच भारी फोन. त्याने घेतला तर तिच्याकडं नाही, तिच्या घरच्यांनी दिला तर त्याची ऐपत नाही..!!

आजच्या किशोरवयीन पिढीला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. ₹५००० मद्ये चांगल्या सोयींचा अँड्रॉइड फोन उपलब्ध होतो, जो तुम्हीच त्यांना वाढदिवसाला गिफ्ट देता. फेसबुक, इंस्टा, युट्युब ह्यासारख्या गोष्टी मा. चहावाले काका आणि अंबानी मामा यांच्या संयुक्त विद्यमाने १.५ जीबी डेटा दररोज उपलब्ध आहे तेही कवडीमोल भावात, तिच्याकडेही आणि त्याचकडेही..!!
हे झालं फक्त उपलब्धतेविषयी..

वापराकडे पाहायला गेलं तर कुणी राज्यसभेत काय चाललंय ह्याची माहिती घ्यायला इंस्टा वर अकाउंट काढत नाही, किंवा शाळेत मास्तर नीट शिकवत नाही म्हणून तो धडा युट्युबवर जाऊन पाहत नाही (पाहणारेही आहेत पण प्रमाण खूप उपेक्षनीय), करतं ते आपला फोटो लोकांनी पहावा, लाईक करावा, छान कमेंट्स कराव्या, प्रसंगी मेसेज यावा ह्याच अपेक्षेने. सोशल मीडियाची स्वतःची काही इंजिन्स असतात जी तुम्ही जे साहित्य(कंटेंट) पाहता, शोधता त्या विषयांना अनुसारच ती तुम्हाला पुढे गोष्टी दाखवत जातं. तुम्हाला त्याची सवय लागून त्याचं व्यसन कधी होतं तुमचं तुम्हालापण समजत नाही. हे व्यसन लय जालीम बरं. एकवेळ दारू परवडली पण हे लय बेकार..

पण आज ह्या व्यसनातून रोजगार तरुण मिळत असेल तर?? गावाकडं १००रु मध्ये एडिट करून देतात पोरं फोटो, अशी ७-८गोळा केली आणि त्यांच्या कौशल्याला एक व्यावसायिक टच दिला की एक ग्राफिक्स डिझाईन कंपनी चालू होऊ शकते. फोटो एडिटिंगचे तसेच फोटोग्राफीचे दर आज गगनाला भिडत आहेत. व्यावसायिक डिजिटल आणि सोशल मीडियातील २ तज्ज्ञ लोक असतील तर हे व्यसन आज पैसा कमवायचं साधन कधी बनून जाईल समजणार पण नाही.

तुम्ही म्हणाल फोटो काढणाऱ्याचं आणि एडिटिंग करणाऱ्याचं पोट भरलं. ज्याच्यासाठी जाळ धुरर वाल्या कमेंट्स आल्या त्या फोटो मधल्या सेलेब्रिटीचा नुसतं फेमस होऊन उपयोग ??? डिजिटल व्यवसायात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नामक एक ट्रेंड उभा ठाकतोय. हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दुसर तिसरं कोणी नसून तुमच्या आमच्यातीलचं लोकं असतात ज्यांचे काही हजारांमध्ये फॉलोवर्स असतात. आपल्या कारामतींमुळे ती समाजात प्रचलित असतात. थोडक्यात हे छोटेखानी सेलेब्रिटीच असतात..

आजचं युग हे साहित्य(Content) युग आहे. उद्योगधंदा सुरू केला तरी त्याला चर्चेत आणायला आज चौकात फ्लेक्स लावून भागत नाही. माणूस आज चौकापेक्षा फोन आणि सोशल मीडियावर जास्त सापडतो. डिजिटल आणि सोशल मिडियावरची ओळख खूप महत्त्वाची असते. त्यासाठी तुम्हाला सिनेतारका परवडत नसतील तर किमान किमतीत हे छोटेखानी सेलेब्रिटीच कामी येतात.

थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, धुरर करणारा विक्या, त्याचे फोटो काढून एडिटिंग करणारे मित्र ह्यांना बेरोजगारांचा ठप्पा लावून हिणवू नका. त्यांना फक्त एक ब्रेकची गरज आहे. समाजाचं खोटं भान असेल आणि युवा पिढीची खोटी काळजी असल्याचा आव आणू नका. काही करू वाटलंच, त्यांच्या आधुनिकतेला वाव द्या.. डॉक्टर, इंजिनियर, मॅनेजर अभ्यास करून होतीलच ते, पण त्या नाशवंत रोजगराबरोबर हसत खेळत पैसा कमावण्याच्या साधनांचा उलगडा करून द्या..!!

-वृषाल भोसले-(मुक्त लिखाण )