राजगुरुनगर । श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानच्या विश्वस्तांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व सह कार्यकारी विश्वस्त यांच्या निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली. भीमाशंकर देवस्थान हे खेड तालुक्याच्या हद्दीमध्ये येत असल्याने अध्यक्षपदाचा मान खेड तालुक्याला मिळायला हवा अशी अनेक वर्षांपासून येथील जनतेची मागणी होती. ती लक्षात घेऊन सर्वानुमते अॅड. सुरेश कौदरे यांच्या रूपाने खेड तालुक्याला प्रथमच अध्यक्षपद मिळाले आहे.
सर्व विश्वस्त मंडळाने एकत्र येऊन संगनमताने विकासकाम करणे आवश्यक आवश्यक आहे. भिमाशंकर देवस्थानाचा नुकताच 139 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून सदर कामे दर्जेदार होण्यावर भर दिला पाहिजे, असे मत मावळते अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. अॅड. विकास ढगे पाटील यांना उपाध्यक्षपद मिळालेले असून खेडचे तहसिलदार सुनील जोशी हे पदसिद्ध कार्यकारी विश्वस्त आहेत. खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सुरेश गोरे, खेडचे तहसिलदार सुनील जोशी यांसह इतर विश्वस्त मंडळ उपस्थित होते. स्थानिकांना विश्वासात घेऊनच परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे अॅड. सुरेश कौदरे यांनी निवडीनंतर सांगितले.