भिलाली येथे चोरट्यांनी एकाच दिवशी पाच बंद घरे फोडली

जळगाव : पारोळा तालुक्यातील भिलाली येथील पाच बंद घरे चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोकड मिळून दोन लाख 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. धाडसी चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाच वेळी पाच ठिकाणी चोरी
कुणाल रंगराव पाटील (22, रा.भिलाली, ता.पारोळा, जि.जळगाव ) यांच्या आजी या बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता जेवण करून झोपल्या असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरातील लोखंडी पेटी लांबवली व नंतर ती एका शेतात नेत कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोकड लांबवली. गुरुवारी पहाटे ही बाब उघडकीस आली तर भिलाली गावातीलच विशाल सूर्यकांत पाटील, लोटन तुळशीराम पाटील, रवींद्र साहेबराव पाटील, शंकर बडगू पाटील यांच्याकडे देखील चोरी झाली तसेच गावातील संत सोनगीर महाराज मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पारोळा पोलिसांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. चोररट्यांनी सोन्यासह चांदीचे दागिणे मिळून एकूण दोन लाख 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.या प्रकरणी कुणाल पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहे.