भिवंडीतील रस्ते खड्ड्यात

0

भिवंडी : भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची भीषण दुर्दशा झाली आहे. खड्डे न भरल्याने रहिवाशांना दहा दिवसांपासून वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमध्ये घाण पाणी साचून डासांचा प्रादूर्भाव वाढत आहे. प्रशासनाने स्वत: गांभीर्याने लक्ष घालून खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे अशी मागणी भिवंडी पूर्वचे शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे यांनी आयुक्तांकडे पत्र पाठवून केली आहे.

ठेकेदारांवर कारवाईची मागणी
शहरातील अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका, वंजारपट्टी नाका ते नदीनाका, कल्याण रोड राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर येथे मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले आहेत. शिवाय अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून दररोज येत आहेत. घाण पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढत आहे. आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. प्रशासन निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करणार्या ठेकेदारांवर प्रभावीपणे कारवाई करीत नाहीत. त्यामुळे या ठेकेदारांवर कारवाईची मागणी आता जोर धरु लागली आहे.

कामांचा अहवाल मागवा
प्रभाग अधिकार्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात खड्ड्यांची दुरूस्ती करून घेण्यासाठी तसेच जंतूनाशकांची सर्वत्र परिणामकारक फवारणी करून घेण्यासाठी कार्यक्षेत्रात पाठविण्यात यावे. त्याचप्रमाणे प्रभाग अधिकार्याने व्यवस्थित कामे करून घेतली आहेत किंवा नाही यासाठी उपायुक्त आरोग्य विभाग यांच्याकडून प्रत्यक्षात कामाची पाहणी केल्यानंतर वस्तूस्थितीवर आधारित अहवाल मागवावा म्हणजे थोड्या फार प्रमाणात शहर स्वच्छतेचे आणि रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम केले जाईल अशी माहिती आमदार रूपेश म्हात्रे यांनी दिली.