भिवंडी (रतनकुमार तेजे ) : मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपास नाका येथे हळदी समारंभाचा कार्यक्रम उरकून घरी परणाऱ्या चुलत भावांचा रेडिमिक्सर कॉंक्रीट ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी जैन साध्वीच्या जथ्याला मुंबई नाशिक महामार्गावरील माणकोली हद्दीत अरुण कुमार क्वारीसमोर ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका साध्वीसह व्हीलचेअर मदतनीस जागीच ठार तर दोघी जणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.साध्वी रंजना हिराचंद जैन (५२रा. ठाणे ) व मदतनीस रत्नी (४० रा. झारखंड ) अशी ठार तर साध्वी शकुंतला चोपडा,व मदतनीस सुनिता ( ४२) अशी जखमींची नांवे आहेत.जैन साध्वी कल्पसिता ( ममता ) ,रंजना ,शकुंतला ,निषा आदींचा जत्था झारखंडहून तिर्थाटन करून ठाणे येथे परतत होते.सदर साध्वी माणकोली बायपास नाक्याजवळील अरुणकुमार क्वारी समोर असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून साध्वीच्या जथ्याला धडक दिली.या धडकेत साध्वी रंजना व मदतनीस रत्नी या दोघी जागीच ठार झाल्या आहेत.तर साध्वी शंकुतला व मदतनीस सुनिता या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.अपघातातून साध्वी कल्पसिता चोपडा व निषा मेहता सुदैवाने बचावल्या आहेत.या अपघात प्रकरणी ट्रक चालक दया शंकर यादव ( ४५ रा.अंधेरी ) यास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय गळवे यांनी अटक केली आहे.