भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती

0

कल्याण । भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या रस्त्यासाठी काही काही ठिकाणचे भूसंपादन करणे शिल्लक असल्याने तो प्रश्‍न निकाली निघताच प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात केली जाणार आहे. या जमिनीवरील रस्त्याचे सहा पदरीकरण पूर्ण झाल्यावर कोन ते शीळ असा उड्डाण रस्ता (एलिव्हेटेड कॉरिडॉर) तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीला राज्य रस्तेविकास महामंडळाचे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला सरकारनेही मंजुरी दिली आहे. सरकारने भूसंपादनासाठी नऊ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. सदर रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यासाठी सरकारने निविदा प्रसिद्ध करुन कंत्राटदार कंपनीदेखील नेमली आहे. मात्र, काही ठिकाणी हा रस्ता रेल्वेमार्ग ओलांडून जाणार आहे. तेथे लागणार्‍या जास्तीच्या जागेवर लवकरच तोडगा काढून भूसंपादन करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी सबंधित अधिकार्‍यांना दिले.

भूसंपादनाचा प्रश्‍न सुटताच रस्त्याचे काम सुरू होईल. या रस्त्यालगतची काही झाडे तोडावी लागणार आहेत. त्याला महापालिकेने मंजुरी यापूर्वीच दिली आहे. या जमिनीवरील रस्त्याचे सहा पदरीकरण पूर्ण झाल्यावर कोन ते शीळ असा उड्डाण रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याला राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी किती पैसे लागतील, तो कसा असेल आदी तपशील त्यात असणार आहे. हा कॉरिडॉर कोन ते पत्रीपुलादरम्यान कल्याण खाडीवरुन नेताना त्याची रचना कशी असेल तेही त्यातून स्पष्ट होईल. सध्याचे खाडीपूल पुरेसे आहेत की, स्वतंत्र खाडीपुलाची गरज भासेल हेही त्यातून स्पष्ट होणार आहे.