डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिले आदेश
नागपूर : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करु, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.
हे देखील वाचा
सदस्य सुनील केदार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 45 अन्वये इमारत बांधकामासाठी विकास परवानगी दिली जाते. तथापि, प्राधिकरणातर्फे या इमारतीमधील कोणत्याही प्रकारच्या रासायनिक साठ्यासाठी वापर परवानगी दिली जात नाही.
भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रातील अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सर्व अनाधिकृत बांधकामा प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये निर्गमित केलेल्या नोटीस विषयी सदर अनाधिकृत बांधकाम हे शासनाच्या 2017 च्या धोरणानुसार नियमित होते किंवा कसे याची प्रथमत: छाननी/पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कासनाची कार्यवाही करण्याचे नियोजित आहे. अनाधिकृत गोदामासंदर्भात शासनाच्या संबंधित विभागास पोलीस संरक्षण दिले जाईल व तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी विचारलेल्या उपप्रश्नाना उत्तर देताना सांगितले.