मुंबई : मारहाणीच्या निषेधार्थ सामूहिक रजेवर गेलेल्या आंदोलक डॉक्टरांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. कामगारांप्रमाणे वर्तन करणे डॉक्टरांना शोभणारे नाही. सुट्टीच्या नावाखाली संप करणे हा मूर्खपणा व अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे. असे वर्तन म्हणजे डॉक्टरी पेशाला काळिमाच आहे, असे सुनावतानाच, एवढीच भीती वाटत असेल तर डॉक्टरांनी नोकरी सोडावी, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने आंदोलकांना फटकारले.
सुट्टीच्या नावाखाली संप, ही अराजकता
डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलनाविरोधात अफाक मांडवीय यांनी अॅड. दत्ता माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आंदोलक डॉक्टरांना खडेबोल सुनावले. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती वाटत असेल तर जागा खाली करा. रुग्णालय प्रशासन तुमच्या जागी दुसर्यांची नेमणूक करेल. सुट्टीच्या नावाखाली एकप्रकारे संपच करत आहात. ही अराजकताच आहे, असे न्यायालयाने सुनावले. निवासी डॉक्टर कामावर आले नाहीत तर रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी. याशिवाय, न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आणि संबंधित कायद्यान्वेही कारवाई करता येऊ शकते, असे निर्देशही न्यायालयाने दिले. राज्यभरातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे सोमवार सकाळपासून 58 लोकांचा मृत्यू झाला, असे अॅड. माने यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होते.
आज पुन्हा सुनावणी, मार्डला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, कामापासून दूर राहू नका, असे आम्ही डॉक्टरांना सांगितले आहे. या हल्ल्यांच्या घटनांमुळे त्यांना भीती वाटते म्हणून ते कामावर येत नसल्याचे मार्डच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले. त्यावर मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच मार्डची अशी भूमिका असेल तर त्यांचा कोणताही सदस्य नियमबाह्यपणे कामापासून दूर राहिला तर संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनांना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मुभा आहे, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचे हत्यार उपसत असेल तर त्यांचे वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सामूहिक रजेवर जाण्याचा डॉक्टरांचा अधिकार आहे. परंतु अशाप्रकारे रुग्णांना वेठीस धरून मागण्या पूर्ण करून घेणे चुकीचे असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले. दरम्यान, उच्च न्यायालयाने मार्डला प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत सर्व सदस्य डॉक्टरांना कामावर रुजू होण्यास सांगा, असे आदेशही न्यायालयाने दिले.