भीमसृष्टीचे काम जलदगतीने पूर्ण करावे

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या शेजारी उभारण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागे असणारी जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात समाविष्ट करून तेथे उद्यान विकसित करण्यात यावे, स्मारकाजवळ असणारा पीएमपीएमएलचा बस थांबा रद्द करून तो थांबा क्रोमामॉल याठिकाणी असणार्‍या जागेत स्थलांतरित करण्यात यावा, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धम्मदीप प्रतिष्ठान व हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशनच्या वतीने बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत महापालिकेकडून मागण्या मान्य केल्या जात नाही; तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशा इशारा आंदोलकांनी दिला.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
या आंदोलनात धम्मदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल वडमारे, सरचिटणीस आनंद साळवे, दीपक साबळे, हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव, विकास गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात लावलेला चुकीचा फलक त्वरित काढून त्याठिकारी दुरुस्ती फलक लावण्यात यावा, स्मारकाचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नकाशावर करण्यात यावा, गांधीनगर झोपडपट्टी घोषित करून तेथील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यात याव्यात, स्मारकात माता रमाबाई यांचा पुतळा बसवण्यात यावा, स्मारकाच्या गेटबाहेर डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट माहिती देणारा फलक लावावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.