धुळे । भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद धुळ्यात रात्री उमटले. नगाव बारी आणि कृउबा समिती परिसर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी बसवर दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला. शहरातील पारोळा रोडवर कृउबा समितीजवळ रस्त्यावर जळगावकडून येणार्या जळगाव-धुळे बस क्र. (एमएच 14 बीटी 3911) या बसवर रात्री 9 वाजेच्या सुमारास एका जमावाकडून अचानक दगडफेक झाली. दगडफेकीत बसच्या चालक कॅबीनची काच फुटली. दगड काच तोडून बसमध्ये आल्याने प्रवासी घाबरले. प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबविल्याने पुढील अपघात टळला. बस थांबते तो पर्यंत दगडफेक करणार्यांचा जमाव तेथून पळाला. घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या आझाद नगर पोलीस स्टेशनवरील फौजफाटा पोलीस निरीक्षक दत्ता पवारासह घटनास्थळी दाखल झाला.
दुसरी घटना नगाव बारी परिसरात मुंबई-आग्रारोडवर रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. धुळे -शिदखेडा बस क्र.(एमएच 20 बीएल 0923) क्रमांकाच्या बसवर मागून मोटारसायकलवर आलेल्या 3 युवकांनी बसवर दगडफेक केली. त्यामुळे बसची पुढची काच फुटली. दगड फेकल्यानंतर ते युवक तेथून पसार झाले. घटनेनंतर देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद निकम हे घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. दगडफेकीनंतर जमाव तेथून पसार झाला. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.