पुणे-भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत २ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसंच पुढील सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना हजर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Judicial custody of all five accused in Maharashtra's Bhima Koregaon violence case has been extended till 2 Aug 2018. Court has also directed to produce all the accused on next date of hearing.
— ANI (@ANI) July 4, 2018
पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या आणि त्यानंतर कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगल प्रकरणी पुणे पोलिसांनी नागपूर, मुंबई आणि दिल्ली येथून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून रोना विल्सन, रिपब्लिकन दलित पँथरचे सुधीर ढवळे, नागपूर येथील वकिल सुरेंद्र गडलिंग, प्राध्यापक सोमा सेना आणि महेश राऊत यांना अटक करण्यात आली होती. १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत नक्षलवाद्यांचा हात असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा दावा करीत ५ जणांना पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्यांपैकी दलित लेखक सुधीर ढवळे यांनी दंगलीपूर्वी दोन दिवस आगोदर पुण्यात शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेच्या आयोजनासाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला असून याची चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर या एल्गार परिषदेचा आणि दंगलीचा संबंध असेलच असे सांगता येत नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बचावासाठीच नक्षलवादी ठरवत आंबेडकरी तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप एल्गार परिषदेच्या आयोजकांनी केला होता.