मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यासह आनंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांना दिलासा मिळाला आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश हायकोर्टाने पुणे पोलिसांना दिले आहेत. ही मुदत आज संपणार होती. गुरुवारी या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईविरोधात गौतम नवलखा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने १ नोव्हेंबरपर्यंत नवलखांवर कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश दिले होते.
दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती. मात्र, अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे सांगत काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या सर्वांच्या स्थानबद्धतेचे आदेश दिले होते.