केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री अनंतकुमार हेगडे पुन्हा नव्या वादामुळे चर्चेत आले आहेत. बल्लारी येथे कार्यक्रमासाठी जाताना त्यांच्या गाडीसमोर दलित आंदोलकांनी निदर्शने करुन त्यांच्या याआधीच्या वक्तव्यांचा निषेध केला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार भारताचे रुपांतर स्कील्ड भारतामध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. भुंकणार्या भटक्या कुत्र्यांकडे लक्ष न देता आम्ही आमच्या बांधिलकीसह या मार्गावर चालत राहू, असे विधानही त्यांनी भाषणात केले. भटके कुत्रे हा शब्दप्रयोग केल्यावर दलितांमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली आणि कार्यक्रमानंतर त्यांनी हेगडे यांच्याविरोधात पुन्हा निषेध नोंदवला आहे.
हेगडेंना पदावरून हाकलावे
अनंतकुमार हेगडे यांनी यापुर्वीही वादग्रस्त विधान करुन रोष ओढाऊन घेतला होता. स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणार्यांना त्यांच्या आई-बापांचा पत्ता नसतो. आम्ही राज्यघटना बदलण्यासाठीच सत्तेत आलोय, असे वक्तव्य हेगडे यांनी केले होते. अनंतकुमार हेगडे यांच्या या विधानाचा अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करत खडे बोल सुनावले. हेगडेंनी दलितांबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला असल्याचे प्रकाश राज यांनी ट्विटरवर म्हटले आहे. अनंतकुमारांचे आता अति झाले अनंतकुमार हे वारंवार दलित समाजाबाबत अपशब्द वापरत आहेत. आता तर त्यांनी दलितांना कुत्रे म्हणण्यापर्यंत मजल मारली आहे. हे आता अति झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करून त्यांना पदावरून हाकलावे अन्यथा हेगडेंच्या वक्तव्यांना तुमचा छुपा पाठिंबाच आहे, असे मानले जाईल, असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.
हेगडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
कर्नाटकमधील कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार नागपूरातील इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आंबेडकरी अनुयायांनी हा तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला.