भुजबळांचे बरेवाईट झाल्यास सरकार जबाबदार

0

पत्राद्वारे शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ दोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांच्या शारीरिक स्वास्थावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे वयाच्या 71 व्या वर्षी तुरुंगात राहण्याची वेळ आलेल्या भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रात पवारांनी छगन भुजबळांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली असून, भुजबळांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशाराच दिला आहे.

भुजबळांचा जामीन वारंवार नाकारला
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची प्रकृती ढासळत असून, मला त्यांच्या प्रकृतीविषयी अतिशय चिंता वाटत आहे. त्यांचे वय 71 वर्ष असून, ते 14 मार्च 2016 पासून (2 वर्ष) तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती अतिशय कमकुवत झाली आहे. हे कायदेशीर प्रकरण आहे. माननीय न्यायालयाने छगन भुजबळ यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानले जाईल. जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे. हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचे नाही.

त्यांचे योगदान विसरता येणार नाही
छगन भुजबळ हे ओेबीसी नेते असून, 50 वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पर्यटन मंत्री अशा जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय, महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नाही. माझी फार अपेक्षा नाही. पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढते वय पाहता, आवश्यक ती पावले उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, अशी मला खात्री आहे. मला हे लिहिताना दु:ख होते आहे, पण तरीही येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचे सरकार जबाबदार असेल.