अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत
पुणे : भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा आहे, असे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी
संविधान बदलले पाहिजे या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे नरेंद्र मोदी यांनी कधीही खंडण केले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1949 साली केलेल्या ठरावानुसार ते अद्यापही संविधान मानत नाहीत. आणि नरेंद्र मोदी त्या संघटनेतून वर आले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणे म्हणजे ही नरेंद्र मोदींची नौटंकी असल्याची टीकाही अॅड. आंबेडकर यांनी केली. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथे आयुष्यमान भारत या आरोग्य योजनेचे उद्घाटन करताना मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो, असे वक्तव्य केले होते. त्याविषयी विचारले असता आंबेडकर ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
जामीन मिळायला हवा होता
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. याप्रकरणी ते गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत. भुजबळ यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुटकेसाठी यापूर्वी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती. आमचा विकास तुरुंगात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही, असे गार्हाणे त्यांनी ठाकरेंसमोर मांडले. त्यावर भुजबळ यांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते. आता प्रकाश आंबेडकर यांनीही भुजबळ यांच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे.