भुजबळ कुटुंबीयांची 300 कोटींची मालमत्ता जप्त

0

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्राप्तिकर विभागाने बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत कारवाई करत भुजबळ कुटुंबीयांची 300 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. भुजबळ यांना गेल्यावर्षी मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून भुजबळ आर्थररोड तुरुंगात आहेत.

भुजबळांच्या अडचणी वाढल्या
सक्तवसुली संचालनालयाने काही महिन्यांपूर्वी 17 राज्यांतील 100 ठिकाणी छापे टाकले. त्यात काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग करणार्‍या 500 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. भुजबळ यांच्याशी संबंधित एका व्यक्तीच्या निवासस्थानावरही सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले होते. बुधवारी प्राप्तिकर विभागाने बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत भुजबळ कुटुंबीयांची 300 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांमधून घेतलेल्या मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. मालमत्ता जप्त झाल्याने भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

या मालमत्ता केल्यात जप्त
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाना (80 कोटी), सांताक्रूझमधील आलिशान घर (11.30 कोटी) याचा समावेश आहे. याशिवाय, वांद्रे पश्चिममधील हबिब मनोर आणि फातिमा मनोर या इमारतीही जप्त करण्यात आल्या आहेत. या इमारतींची किंमत सुमारे 43 कोटी 61 लाख रुपये आहे. पनवेलमधील 87 कोटी रुपयांचा भूखंडही जप्त करण्यात आला आहे. कागदोपत्री या मालमत्तेची किंमत 223 कोटी असली बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत 300 कोटींपेक्षा जास्त असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.