श्रीवर्धन । श्रीवर्धन नगरीत प्रवेश करताना जवळच असलेल्या भुवनाळे तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून 8 जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या हस्ते या तलावाचे लोकार्पण व उदघाटन होणार आहे. या भुवनाळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भुवनाळे तलाव असे नाव देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.श्रीवर्धन मधील वाळवटी प्रवेशद्वाराला स्वयंभू जीवनेश्वर प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. तर कुंडल नानासाहेब धर्माधिकारी जीवनेश्वर कुंड असे नाव देण्यात आले आहे. त्याच बरोबर आराठी मार्गे प्रवेशद्वाराला श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार असे नाव देणात आले आहे. त्याचप्रमाणे भुवनाळे तलावास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी श्रीवर्धनमध्ये जोर धरत आहे. श्रीवर्धन बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीने याबाबत नगरपरिषद श्रीवर्धन यांच्याकडे वारंवार लेखी मागणी केली जात आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी देखील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. भुवनाळे तलावाच्या कुंडात दोन विहिरी आहेत. या विहिरीतील पाण्याचा वापर हरिजन समाज पूर्वापार करत असून या तलावात हरिजन समाज बांधव गौरी गणपती विसर्जन करत असत त्यामुळे या तलावास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. हा हरिजन समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आसल्याचा उल्लेख विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर यांनी मागणी केलेल्या लेखी पत्रात केले आहे.