रिमझिम धारा व धुक्याचे काहूर या वातावरणात पर्यटकांनी घेतला वर्षाविहाराचा आनंद
सायंकाळी पाचनंतर धरण परिसरात वाहनांना बंदी
लोणावळा : लोणावळा परिसरात पाच दिवस मुसळधार कोसळल्यानंतर आज पावसाने काहीशी उघडिप घेतल्याने लायन्स पॉईंट व भुशी धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. आयएनएस शिवाजी ते लायन्स पॉईंट दरम्यान सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुक्याचे काहूर माजल्याने हा सर्व परिसर धुक्यात हरवून गेला होता. पावसाच्या रिमझिम धारा व धुक्याचे काहूर या वातावरणात पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेत होते. पावसाने उघडिप घेतल्याने भुशी धरणार्च्ंया पायर्यांवरुन वाहणार्या पाण्याचा वेग कमी झाल्याने आज पर्यटकांना या पायर्यांवर जाण्यास मुभा देण्यात आल्याने पर्यटकांनी पायर्यांवर प्रचंड गर्दी केली होती. तसेच पायर्यांच्या खालील बाजुला असलेल्या नाल्यांमध्ये तसेच खड्डयांमध्ये पर्यटक चिंब भिजण्याचा आनंद घेताना दिसत होते. सहारा पुलाजवळील दोन्ही धबधब्यांच्या खाली पर्यटकांची गर्दी होती. वारंवार सुचना करुन देखिल काही अतिउत्साही पर्यटक या धबधब्यांच्या डोंगरातील बाजुला जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.
अवैध दारूविक्री करू नये
पर्यटकांच्या सुरक्षेकरिता लोणावळा शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. धरण परिसरात अतिरिक्त पोलीस व महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले हे स्वतः त्यांच्या कर्मचार्यांसह लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट व धबधब्यांच्या परिसरात पेट्रोलिंग करत होते. सर्व ठिकाणच्या विक्रेत्यांना त्यांनी हुक्का तसेच अवैध दारु विक्री न करण्याचे आवाहन केले होते. लायन्स पॉईंट परिसरातील हुक्का विक्रीचा बिमोड करण्याकरिता पोलीस निरीक्षक इंगवले यांनी यासर्व प्रकारांवर वैयक्तिक नजर ठेवल्याने या दोन दिवसात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. कार्ला लेणी व भाजे लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. भाजे धबधबा, लोहगड व विसापुर किल्ला या परिसरात जाणारे पर्यटकांचे जथ्थे व त्यांची वाहने यामुळे मळवली भागात वाहतुक कोंडी झाली होती. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु झाली. दरम्यान लोणावळा खंडाळ्यासह कार्ला, मळवली भागातील सर्वच पर्यटनस्थळे हाऊसफुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
सायंकाळी पाचनंतर प्रवेशबंदी
भुशी धरणाकडे जाणार्या रस्त्यावर सायंकाळी पाचनंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याच सोबत शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणार्या लक्झरी बस, मिनीबस, टेंपो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणार्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. भुशी धरण, लायन्स पॉइंट, भाजे धबधबा येथे पर्यटकांची गर्दी होते. यामुळे पुणे-मुंबई महामार्गासह भुशी रस्त्यावर, भाजे लेणी रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. पर्यटकांची वाढती संख्या व अपुर्या सुविधांमुळे वाहतूक नियमन करताना लोणावळा तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमछाक होत आहे. मागील काही आठवड्यापासून लोणावळा शहरात पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. त्यामुळे अनेकदा तर वाहनांसोबतच पायी फिरायला येणार्या पर्यटकांना चालनेही मुश्कील होते.
अवजड वाहनांना बंदी
या सर्वांवर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणार्या रस्त्यावर लक्झरी बस, मिनीबस, टेंपो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांना बंदी घातली आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी पाच वाजता पर्यटकांना भुशी धरणावरून बाहेर काढायला सुरुवात करून सहा वाजता धरण पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हाच नियम लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, भाजे धबधबा येथेही लावण्यात येणार आहे. लोणावळा उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी डी.डी.शिवथरे यांनी ही सर्व माहिती दिली. तसेच हुल्लडबाज पर्यटकांवर आणि महिलांची छेडछाड करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी सांगितले की, शनिवार, रविवार व इतर शासकीय सुट्टीच्या दिवशी लोणावळा शहरात खंडाळा व वलवण एक्झीटमधुन फक्त कार व मोटार सायकल यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पर्यटकांना आपली वाहने रस्त्यावर पार्क करु नये केल्यास अशा वाहनांना जॅमर लावण्यात येईल. प्रत्येक चेकींग पाँईन्टवर ब्रिथ अॅनालायझरद्वारे चेकींग करुन दारु पिऊन वाहन चालविणारे व तळीरामांवर कारवाई करण्यात येणार आहेत. लेन कटींग करुन व ओव्हरटेक करणार्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सहारा ब्रिज व धबधब्यासमोरील रोडवर वाहने पार्कीग करु नयेत. अशा वाहनांची व्हिडीओ शुटींग करुन त्याद्वारे वाहनांवर खटले भरुन कारवाई करण्यात येईल. वाहतूक कोंडी तसेच पर्यटन स्थळावरील काही धोके लक्षात घेता सायंकाळी 5 वा. नंतर सर्व प्रकारच्या वाहनांना भुशी धरणाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. 6 वा. नंतर भुशी डॅम, घुबड तलाव, टायगर पाँईन्ट, लायन पाँईन्ट, भाजे धबधबा व इतर सर्व प्रकारचे पर्यटन पाँईन्टवर थांबण्यास तसेच येण्यास मनाई करण्यात आली आहे.