दीपनगर– जळगावसह भुसावळात येणार्या मुख्यमंत्र्यांनी अचानक प्रकृती स्वास्थाचे कारण पुढे करीत दौरा रद्द करण्याच्या कारणाला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे बोलले जात आहे. खरे तर भुसावळच्या अटल योजनेच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते मात्र त्यावेळीही त्यांनी दौरा रद्द केला होता तर शुक्रवारीही त्यांनी भुसावळसह जळगावच्या दौर्याकडे पाठ फिरवली. सुमारे दोन वर्षांपासून मंत्री मंडळाबाहेर असलेले व सरकारवर कमालीचे नाराज असलेल्या एकनाथराव खडसे यांनी सरकारवर अधिवेशनात व सार्वजनिक कार्यक्रमात सरकारवर टिका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यातच शुक्रवारी जळगावसह दीपनगरच्या कार्यक्रमात त एकाच व्यासपीठावर आल्यास प्रसिद्धी माध्यमांकडून खडसेंच्या मंत्री मंडळ प्रवेशाचे काय? या विषयावर होणारी विचारपूस, जिल्ह्यातील अनेक प्रश्नांबाबत होणारी विचारणा तसेच जळगावच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री खडसे, माजी मंत्री सुरेश जैन आदी एकाच व्यासपीठावर आल्यानंतर भाषणात जुगलबंदी रंगली असती व त्या टिकेपासून वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्याची टिका सोशल मिडीयावर रंगताना दिसून आली.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे एकही दिसले नाही बॅनर
राज्याचे मुख्यमंत्री भुसावळात येत असलेतरी त्यांच्या स्वागताचे शोधूनही एक बॅनर कार्यक्रम स्थळानजीक वा रस्त्यावर तसेच शहरात सापडले नाही तर दीपनगरातील कंत्राटदारांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या बॅनरबाबत (जाहिरातीबाबत) दाखवलेली अनुत्सुकता न बोलताही बरेच काही सांगणारी आहे. राज्यात भाजपा सरकारचा बोलबाला असलातरी भुसावळात मात्र शुक्रवारी वेगळे चित्र दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला असलातरी पहाटेच मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी दौरा रद्द केल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित असलातरी शुक्रवारी दिल्लीहून महत्त्वाचे राजकीय नेते येत असल्याने व बैठक असल्याने मुख्यमंत्री येत नसल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्र्यांनी भाषणात दिले तर दुसरीकडे जिल्हा माहिती प्रशासनाने मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने मुख्यमंत्री येत नसल्याची माहिती दिली. दौरा रद्द झाल्यामुळे करोडा रुपयांचा चुराडा झाला हेदेखील तितकेच खरे !