भुसावळ : सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे त्यामुळे सामान्य नागरीकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परीस्थिती ओढवल्याने भुसावळ नगरपरीषदेने मार्च ते जून या चार महिन्यांची घरपट्टी व पाणीपट्टी कर पूर्णतः माफ करावा, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासह पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे केली आहे.
भुसावळसह जिल्ह्यातील सर्व पालिकांनी कर माफ करावा- प्रा.धीरज पाटील
सध्या कोरोनामुळे जगासमोर एक मोठे संकट उभा राहिले आहे. त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य लोकांना अधिक बसला आहे. गेल्या मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे रोजगार, उद्योगधंदे, दळणवाहतूक पूर्णपणे बंद आहे त्यामुळे लोकांच्या हाताला कामधंदा नाही म्हणून परीस्थिती आणखीणच बीकट झाली आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेत, शहर नागरीकांची चार महिन्यांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील सर्व पालिकेंच्या हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ करण्याची मागणीदेखील करण्यात आली असल्याचे प्रा..धीरज पाटील यांनी सांगितले.
सर्वसामान्यांना दिलासा देण्याची अपेक्षा
कोरोनामुळे सामान्यवर्ग सैरभैर झाला आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी फार कष्ट करावे लागणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेला कामगार, मजूरवर्ग, सामान्य नागरीक हा भार सहन करू शकणार नाही म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व सामान्य नागरीकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांच्या वतीने होत आहे.