भुसावळकरांना गढूळ पाणीपुरवठा : आरोग्य आले धोक्यात

0

सोशल मिडीयावर नगरपालिका कारभाराची खिल्ली

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरात पाच ते सहा दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा गढूळ स्वरूपाचा होत असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे सोशल मिडीयावर पालिकेच्या कारभाराची खिल्ली उडवली जात आहे. तापी नदीपात्रातील पाण्याची उचल करून जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शहराच्या विविध भागात नगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र कालबाह्य योजनेमुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचे जलशुद्धीकरण होत नसल्याने पाच ते सहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही सद्यस्थितीत गढूळ स्वरूपाचा होत आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून पालिकेच्या कारभाराविषयी शहरवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरात होणारा गढूळ पाणीपुरवठा सोशल मिडीयावर चांगलाच रंगला असून पालिकेकडून शहरवासीयांना विनामूल्य चहाचे वितरण होत असल्याची टिका होत आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या प्रकाराची दखल घेवून शहरात शुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

अमृत योजना लांबणीवर
शहरातील नागरीकांना शुद्ध व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा यासाठी अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शहराच्या प्रत्येक भागात नवीन जलवाहिनी टाकणे सुरू करण्यात आले आहे मात्र अमृत पेयजल योजनेसाठी अत्यावश्यक असलेल्या जलकुंभाची व तापी नदीपात्रातील बंधार्‍याच्या कामाला अद्यापही सुरूवात झाली नाही.

जलवाहिनीला वारंवार लागतेय गळती
शहरात पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य व उपजलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो तसेच जलवाहिनीला लागत असलेल्या गळतीमुळे शहराच्या विविध भागात अशुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने त्वरीत दखल घेणे गरजेचे आहे.