जलसंचयामुळे पाणीप्रश्नावर करता येणार मात ; आमदार सावकारेंचा पुढाकार
भुसावळ- शहरात अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू असताना दुसरीकडे पालिका उचल करीत असलेल्या रेल्वेच्या बंधार्याची जलसंचय क्षमता कमी असल्याने अनेकदा शहरवासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. यावर पर्याय रेल्वेच्या बंधार्याला री जॅकेटींग करून त्याची उंची एका मीटरने केल्यास पाणीप्रश्न सुटणार असल्याने आमदार संजय सावकारे यांनी सोमवारी पालिका प्रशासनासोबत त्याबाबतच चर्चा केली. प्रसंगी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर तसेच एमजीपी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अंतिम निर्णय नाही : विविध प्रस्तावांवर चर्चा
शहरात सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत अंतर्गत 110 कोटी रुपये खर्चाचा नवीन बंधारा बांधणे अपेक्षित आहे परंतु हे काम तत्काळ होणे शक्य नाही. त्यामुळे पाण्याची समस्या पूर्ववत झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी सोमवारी अमृत योजनेचा आढावा घेतला. त्यात चार ते पाच पर्यायही सूचवण्यात आले. रेल्वेच्या बंधार्याचे रिजॅकेटिंग करून बंधार्याची उंची एका मीटरने वाढविल्यास जलसाठा वाढणार आहे. रीजॅकेटिंगचे काम नगरपरीषदेमार्फत केले जाण्याची शक्यता आहे. बंधार्यातील पाण्याचा वापर रेल्वे आणि नगरपरिीषद दोन्ही करणार आहेत. रेल्वेला एक टीएमसी पाण्याची आवश्यकता असून उर्वरीत पाणी शहरवासियांची तहान भागवणार आहे. आमदार सावकारे म्हणाले की, अंतिम कुठलाही निर्णय झालेला नाही. विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबत तोडगा काढण्यात येईल.