दोन दिवसात होणार पाणीपुरवठा सुरळीत ; पालिकेकडून जुन्या विहिरींचे पुर्नजीवन करण्यावर भर
भुसावळ- पालिकेच्या बंधार्यातील पाणी संपल्याने शहरवासीयांना गेल्या 7 तारखेपासून टंचाईचे चटके जाणवत आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरीकांसह महिलावर्गाची पाण्यासाठी भटकंती होत आहे तर रणरणत्या उन्हाळ्यात बोअरवेल आटल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी नागरीकांना कसरत करावी लागत आहे. हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी रेटा वाढल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास 300 डे क्यूसेसप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या बंधार्यात पाणी पोहोचण्यास दोन दिवस लागणार असल्याने सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या विहिरींचे पुर्नजीवन
नववर्षाच्या प्रारंभापासून शहरवासीयांना आवर्तन उशीरा सुटत असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे तर पालिकेच्या शहरात मोठ्या प्रमाणावर विहिरी असतानाही व त्यात विपूल पाण्याचा साठा असतानाही त्यांचा पुर्नवापर करण्याबाबत मागणी वाढल्याने पालिकेने या विहिरींचे पुर्नजीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून विहिरीतील गाळ काढला जाणार असून पाण्याचा पंप बसवून नागरीकांना किमान वापरण्यापुरता का होईना पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. शहरातील सहा विहिरींचे पुर्नजीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात मोहित नगर, जुना सातार्यातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळील विहिरी तसेच जाम मोहल्ला, अंजुमन शाळेजवळील विहिर, गांधी नगर, शंभू राजे चौकातील विहिर व तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासह श्री हरी नगर, इंद्रप्रस्थ नगरातील विहिरीतील गाळ काढून तिथे पंप बसवणे सुरू असल्याचे पाणीपुरवठा सभापती पिंटू ठाकूर म्हणाले.
हतनूरमधून सात दिवस मिळणार पाणी
भुसावळ शहरासह जळगाव एमआयडीसी तसेच रेल्वेसाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास 300 डे क्यूसेसप्रमाणे (आठ हजार 400 लिटर पर सेकंद) आवर्तन सोडण्यात आले असून सतत सहा ते सात दिवस हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. भुसावळ पालिकेच्या बंधार्यात हे पाणी पोहोचण्यासाठी किमान दोन दिवसांचा अवधी लागणार आहे तर हे पाणी साकेगाव शिवारातील जळगाव एमआयडीसीच्या बंधार्यासह दीपनगर, रेल्वे व भुसावळ पालिकेच्या बंधार्यात पोहोचेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालिकेचे नियेाजन फोल
शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाल्यानंतर प्रशासनाने 30 टँकर भाडे करारावर लावून शहरातील प्रत्येक घराला 400 लिटर पाणी तीन दिवसांआड देण्याचे नियोजन असलेतरी त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. यामुळे सध्या नागरीकांना नगरसेवकांकडून सेवार्थ मिळणारे टँकर तसेच 800 रुपये टँकरने पाणी विकत घेवून वापरावे लागत आह. तर पिण्याच्या पाण्यासाठी 30 ते 40 रुपयांचा जार घ्यावा लागत आहे.