दोघांच्या मृत्यूने खळबळ ; पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शांती नगरासह गजानन महाराज नगरात तीन दिवसात 900 घरांचे सर्वेक्षण
भुसावळ- शहरातील शांती नगरासह गजानन महाराज नगरातील दोघांचा गत आठवडाभरात स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून या आजाराची शहरवासीयांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. सर्दी, खोकला असलातरी त्याकडे दुर्लक्ष न करता घरीच उपचार करण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे तर एकाच परीसरातील महिलेसह पुरूषाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात गेल्या तीन दिवसात सर्वेक्षण केल्यानंतर 12 संशयीत सर्दी-खोकल्याचे रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांसह लॅब चालकांना स्वाईन फ्लूशी संबंधीत वा त्या संबंधी लक्षणे आढळणारा संशयीत रुग्ण आढळल्यास तातडीने पालिका दवाखान्याला माहिती कळवण्याचे पत्रान्वये कळवले आहे.
दोघांच्या मृत्यूने खळबळ
शहरातील निर्मला चंद्रकांत तळेले (58, शांती नगर, भुसावळ) व विरेंद्र सुभाष चौधरी (44, गजानन महाराज नगर, भुसावळ) या दोघांचे गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी शहरात काहींचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेतली होती. तळेले या गेल्या आठवड्यात जळगावात गेल्यानंतर त्या आजारी पडल्याचे तर चौधरी हे मुंबईहून परतल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा संशय आहे. आरोग्य विभागाने या कुटुंबियातील सदस्यांचीही तपासणी केली मात्र कुणाला स्वाईन फ्लू आढळला नसल्याचे सांगण्यात आले.
तीन दिवसात 900 घरांचे सर्वेक्षण
शांती नगरासह गजानन महाराज नगर भागातील दोघा रुग्णांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. या भागात दहा कर्मचार्यांच्या पथकातर्फे गेल्या तीन दिवसांपासून सुमारे 900 वर घरांचे सर्वेक्षण करण्यात आले तर त्यात 12 सर्दी-खोकल्याचे रुग्ण आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नृपाली सावकारे म्हणाल्या. पालिका मुख्याधिकार्यांनी संशयास्पद रुग्ण आढळल्यास तातडीने माहिती कळवण्याचे शहरातील डॉक्टरांसह लॅब चालकांना पत्रान्वये आवाहन केले आहे तर आजाराबाबत शाळा-महाविद्यालयातूनही आता जनजागृती केली जाणार आहे.
शिवसेना पदाधिकार्यांकडून जनजागृती
स्वाईन फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर भुसावळातील शिवसेना पदाधिकार्यांतर्फे जनजागृती केली जात आहे. जामनेर रोड, वरणगाव रोड, राम मंदिर वार्ड भागात शिवसेना पदाधिकार्यांनी घरोघरी जावून माहिती पत्रकांचे वाटप केले. 30 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपासून भुसावळ शहरात स्वाईन फ्लू जनजागृती पंधरवडा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेतर्फे माहिती पत्रक छापण्यात आले आहे.