भुसावळची जागा काँग्रेसकडे खेचण्याच्या हालचाली

0

उच्च शिक्षित संजय ब्राह्मणे भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक ; भाजपाकडून जागा घेण्यासाठी सेना आग्रही

भुसावळ (गणेश वाघ)- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भुसावळ विधानसभेच्या जागेमुळे युती तुटल्याने राज्यभरात चर्चेत आलेल्या भुसावळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात आमदार संजय सावकारे हे तब्बल 34 हजार 637 मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश झाल्टे व शिवसेनेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांचा पराभव केला होता. पाच वर्षानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्तेच्या सारीपाठात या निवडणुकीत कोण बाजी मारणार? या चर्चांसोबतच इच्छुकांच्या भाऊगर्दीतदेखील वाढ झाली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली जागा काँग्रेसने आपल्याकडे खेचण्याची तयारी केली असून गतवेळचे पराभूत उमेदवार संजय ब्राह्मणे पुन्हा दंड थोपटून यंदाच्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे भाजपाकडील जागेवर सेनेनेही दावा केला असून भुसावळसोबतच जळगावची जागाही यंदा सेनेला हवी आहे तसेच वंचित बहुजन आघाडीही यंदा निवडणूक रींगणात तयारीनिशीही उतरणार असल्याने यावेळची निवडणूक चुरशीची होणार हे तितकेच खरे !

काँग्रेसकडे जागा खेचण्याच्या हालचाली
भुसावळची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असलीतरी सेवानिवृत्त अभियंता असलेले संजय ब्राह्मणे हे काँग्रेसकडून ही जागा लढवण्यास इच्छूक आहे. गुरुवारीच त्यांनी उमेदवारी अर्जाची रीतसर फी भरली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेवून भुसावळची जागा काँग्रेसला सोडण्याची ते मागणी करणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन पाऊले मागे सरकत काँग्रेसला जागा दिली होती त्यामुळे विधानसभेलाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र त्याबदल्यात राष्ट्रवादी रावेरची जागा मागू शकते , असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सेनेचे गठबंधन बांधलेले माजी आमदार संतोष चौधरी स्वगृही अर्थात राष्ट्रवादीत परतले आहेत, जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची मोठी पकड आहे त्यामुळे भुसावळची जागा सोडून रावेरच्या जागेवर ते दावा करू शकतात अर्थात रावेरमधून त्यांचे बंधू अनिल चौधरीदेखील दंड थोपटून निवडणूक रींगणात उतरले आहेत मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णय यात अंतिम राहणार आहे त्यामुळे सध्या केवळ चर्चांना ऊत आला आहे.

काँग्रेसला संघटनाचा अभाव, राष्ट्रवादीचे पारडे जड
भुसावळ विधानसभेचा विचार केल्यास पालिका, कृउबा, पंचायत समितीत कुठेही काँग्रेसचे वर्चस्व नाही वा उमेदवारही निवडून आलेला नाही त्याउलट माजी आमदार चौधरींच्या नेतृत्वात पालिकेत 19 सदस्य निवडून आले आहेत शिवाय शेतकी संघासह, कृउबावर त्यांचे वर्चस्व आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे निश्‍चित पारडे जड आहे. काँग्रेसला जागा सुटलीतरी पक्ष संघटनासोबत, बुथ रचना, मतदारांशी संपर्क ही आव्हाने आहेत. असे असलेतरी गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ.उल्हास पाटील यांनी प्रचाराचा ताळमेळ नसताना, जाहिर सभेचा अभाव तसेच पुरेशी प्रचार यंत्रणा नसतानाही तब्बल 44 हजार 506 मते घेतल्याने भाजपासाठी ही निश्‍चित धोक्याची घंटा ठरू शकते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

भाजपाचे पारडे मजबूत
भुसावळ पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे शिवाय पंचायत समितीवरही भाजपाची सत्ता असून तालुक्यातील 52 गावांपैकी तब्बल 39 ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आहे. भाजपाच्या संघटनासोबतच बुथ रचनेवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला आहे शिवाय लोकसभा निवडणुकीत याच आधारे खासदार रक्षा खडसे यांना मोठ्या प्रमाणावर यशही मिळाल्याचे दिसून आले.

भाजपातर्फे संजय सावकारेच उमेदवार !
सलग दोन टर्मपासून विजयी होणारे आमदार संजय सावकारे हेच यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहणार आहे तर दुसरीकडे सेनेने या जागेवर दावा दाखल केला असलातरी अधिकृत उमेदवार मात्र त्याबाबत पुढे आलेले नाहीत. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी झाल्यानंतर 2014 मध्ये माजी मंत्री एकनाथराव यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता व ते निवडूनही आले होते.

लेवा समाजाचे मतदान निर्णायक
लेवा पाटीदार समाजाचे या मतदारसंघात सुमारे 65 हजार 372 मतदान आहे. त्यात एकूण मतदानापैकी 80 ते 90 टक्के मतदान एकगठ्ठा होते, असा इतिहास आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराकडे लेवा समाज त्याचा विजय निश्‍चित असल्याचे मानले जाते. यंदाच्या निवडणुकीत लेवा समाज कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी असेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यानंतर दलित व मुस्लीम समाजाचे मतदानही निर्णायक ठरणार आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या पटलावर सन 1962 पासून झालेल्या 12 निवडणुकांमध्ये लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांनी तब्बल नऊ वेळा बाजी मारली आहे. पालकमंत्री संजय सावकारे, माजी आमदार संतोष चौधरी आणि मो.यासीन बागवान यांच्या रूपाने केवळ तीन लेवा समाजाबाहेरील उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली मात्र आरक्षणामुळे लेवा समाज सत्तेच्या सारीपाटावरून दूर झाला असला तरीदेखील अद्यापही किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे.

निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपातर्फे आमदार संजय सावकारे, काँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे, राष्ट्रवादीतर्फे उल्हास पगारे, पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे, वंचित बहुजन आघाडीतर्फे अ‍ॅड.राजेश झाल्टे, राजू सूर्यवंशी यांच्यासह अन्य डझनभर इच्छूक आहे. दरम्यान, महायुतीतर्फे रीपाइंला जागा सोडण्याची मागणी केली जात असून ते झाल्यास रमेश मकासरे हे उमेदवार असतील.