आमदार संजय सावकारे यांची पावसाळी अधिवेशनात मागणी ; रस्ते विकासाला परवानगीची मागणी
भुसावळ- भुसावळ शहराच्या हद्दवाढीचा दोन वेळा प्रस्ताव सादर करूनही नगररचना विभागाकडून सकारात्मक दखल घेण्यात न आल्याने व एकूणच टोलवाटोलवी झाल्याने हद्दवाढ थांबली आहे परीणामी नागरीकांना सोयी-सुविधा पुरवताना अडचणी येत असल्याची बाब आमदार संजय सावकारे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडून हद्दवाढ प्रकरणी नगररचना विभागावर कारवाई करण्याची मागणी करीत अमृत योजनेतून पाईपलाइन टाकलेल्या भागात रस्ते विकासाला परवानगी देण्याची मागणी केली. तसेच अमृत योजना, सिडकोच्या माध्यमातून शहर विकास आदी प्रश्नांकडेही त्यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान लक्ष वेधले.
हद्दवाढअभावी सोयी-सुविधा पुरवण्यास अडचण
शहरातील विस्तारीत भागांमध्ये हद्दवाढ करणे आवश्यक आहे. हद्दवाढ नसल्याने या भागातील नागरीकांना सेवासुविधा पुरवता येत नाहीत. आमदार निधीही नगण्य असल्याने या निधीतून पुरेशा सुविधा मिळत नाहीत. हा भाग पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यास प्रश्न सुटू शकेल. यासंदर्भात भुसावळ पालिकेने हद्दवाढीचा वाढीव प्रस्ताव नगरविकास विभागाकडे दिला होता. मात्र हा प्रस्ताव अधिक क्षेत्रफळाचा असल्याने तो कमी करून सुधारीत प्रस्ताव द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या होता. पालिकेने तत्काळ क्षेत्रफळ कमी करुन सुधारीत प्रस्ताव दिला मात्र नगररचना विभागाने तीन महिने हा प्रस्ताव ठेवून नंतर पुन्हा तो वाढवून द्यावा, अशी सूचना केली. अर्थात या विभागाकडून हद्दवाढीसाठी केवळ टोलवा-टोलवी होत आहे यामुळे या विभागावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय सावकारे यांनी पावसाळी अधिवेशनात केली. या सेाबतच भुसावळ व जळगावचा सिडकोच्या माध्यमातून विकास व्हावा, असा मुद्दा त्यांनी मांडला.