भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयात 25 रोजी युवारंग महोत्सव

0

ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांची पत्रकार परीषदेत माहिती ; 60 महाविद्यालयातील 600 विद्यार्थी सादर करणार कला प्रकार

भुसावळ– भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे गुरुवार, 25 रोजी होत असल्याची माहिती ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील 60 महाविद्यालयातील 600 विद्यार्थी आपला कलाविष्कार प्रसंगी सादर करणार आहेत.

25 उपकला प्रकार सादर होणार
महोत्सव यशस्वीतेसाठी 18 समित्या तयार करण्यात आल्या आहेत. संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य, ललीत या पाच मुख्य कला प्रकारातील 25 उपकला प्रकारात जळगाव जिल्यातील 60 महाविद्यालयातून सुमारे 600 विद्यार्थी-विद्यार्थिनी आपला कलाविष्कार सादर करतील. 60 संघव्यवस्थापक व जवळ-जवळ 150 संगीत साथीदार सहभागी होतील.

स्वतंत्र सहा मंचावर कलाविष्कार
सर्व स्पर्धकांना कला प्रकार सादर करता येण्यासाठी स्वतंत्र सहा रंगमंच तयार करण्यात आले असून त्यांना तशी नावेही देण्यात आली आहेत. पहिल्या रंगमंचला स्व.नानासाहेब देविदासभाऊ गोविंद फालक, रंगमंच क्र. दोनला स्व.सुशीलकुमार पुनमचंद नाहाटा, रंगमंच क्र.तीनला स्व.अण्णासाहेब पांडूरंग रामचंद्र पाटी, रंगमंच क्रमांक चारला स्व.पुरुषोत्तमभाऊ सखाराम फालक, रंगमंच क्रमांक पाचला स्व.रामचंद्र विठ्ठल पाटील सभागृह, रंगमंच क्रमांक सहाला स्व.एच.एन.एस.राव यांचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक रंगमंचावर परीक्षक, समिती प्रमुख व सदस्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजेपासून स्पर्धांना सुरुवात होईल.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य व युवक महोत्सव समन्वयक डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.एन.ई.भंगाळे, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील संघव्यवस्थापकांची सभा बुधवार, 24 रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. सभेत वादविवाद व वक्तृत्व या दोन स्पर्धांचा विषय दिला जाईल.