भुसावळ : भुसावळ पालिकेसह विभागात यावल, फैजपूर, सावदा व रावेर नगरपालिकेची मुदत बुधवार, 29 रोजी संपत असल्याने या पालिकांवर प्रशासकांची शासनाकडून करण्यात आली आहे. या संदर्भात नगरविकास विभागाने सोमवार, 27 डिसेंबर रोजी शासन आदेश काढला आहे. यानुसार भुसावळ पालिकेवर भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे तर यावल, फैजपूर, सावदा व रावेर येथे फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली. मुदत संपल्यानंतरच्या काळात प्रशासकिय काळात प्रशासकांच्या अधिपत्याखाली मुख्याधिकारी कामकाज सांभाळतील. आगामी काळात जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोपर्यंत या पाचही पालिकांवर प्रशासकिय राजवट असेल तर भुसावळ विभागातील वरणगाव नगरपालिकेवर सुमारे सव्वा वर्षांपासून प्रशासक म्हणून भुसावळ प्रांताधिकारी कामकाज सांभाळत आहेत.
ठराव झालेली कामे होतील
प्रशासकिय राजवटीत विकासकामांना खीळ बसेल, अशी भीती व्यक्त होत असलीतरी ज्या पालिकांनी मुदत संपण्यापूर्वी सर्वसाधारण सभा घेवून विकासकामांचे ठराव मंजूर केले आहेत, अशा प्रकारची विकासकामे प्रशासकिय राजवटीतही करता येतात. याच अनुषंगाने भुसावळ पालिकेने सोमवारी झालेल्या सभेत तब्बल 263 विषयांना मंजुरी दिली. ही सर्व कामे प्रशासकिय राजवटीत होऊ शकतील. दरम्यान, ओबीसी आरक्षण व कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.