भुसावळ- भुसावळसह बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी दिल्याने बळीराजा सुखावला आहे. भुसावळ तालुक्यात 79.4 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. चारही महसूल मंडळात जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 19.85 मिली पाऊस झाला.
सलग दोन दिवस पावसाची हजेरी
गुरुवारी रात्री शहरात अर्धा तास पाऊस झाला तर शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यानही जोरदार पावसाने हजेरी दिली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 39.4 मिली पावसाची नोंद जलआयोगाने केली. शुक्रवारी दुपारी पावसाला अचानक ढगाळ वातावरण होवून सुरवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे नागरीकांची त्रेधा-तिरपीट झाली. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांची वाढ होईल तर काही भागात रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे.
बोदवड तालुक्यात दमदार पावसाची हजेरी
जून महिना पूर्ण होईपर्यंत पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. पहिल्या दोन पावसामध्ये तालुक्यातील शेतकर्यांनी आपली पेरणी पूर्ण केली. शुक्रवारी दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी तालुक्यासह शहरासह नांदगाव, नाडगाव, ओझरखेड, करंजी, पाचदेवली, गोळेगाव, जामठी, मनूर, शेलवड, मानमोडी, साळशिंगी या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊसाने हजेरी लावली.