भुसावळसह बोदवड व कुर्‍ह्यातील शासकीय गोदामाला सील

0

स्वस्त धान्य वाटपातील शंभर कोटींचे अपहार प्रकरण ; राज्यस्तरीय दक्षता पथकाकडून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात ; कारवाईकडे लक्ष

भुसावळ– स्वस्त धान्यातील ‘मापाच्या पाप प्रकरणी’ जिल्ह्यात दाखल झालेल्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भुसावळ विभागातील भुसावळसह बोदवड व कुर्‍हा येथील शासकीय धान्य गोदामाला सोमवारी रात्रीच सील ठोकले तर गोदामातील महत्त्वाचे रजिस्टर व अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली. भुसावळात शासकीय गोदामात सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याची दाट शंका आहे. अधिकार्‍यांची तब्बल तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धान्य प्रमाणिकरणाची प्रक्रिया संपली तसेच साठा तपासणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा अधिकार्‍यांनी या गोदामाला सील लावले. या कारवाईने स्वस्त धान्याचा काळाबाजार करणार्‍या अधिकार्‍यांसह वाहतूकदारांच्या साखळीत मोठी खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी गोदामांना सील ठोकण्यात आल्यानंतर आता पुढील कारवाई कुणावर ? असा प्रश्‍न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

कुर्‍हासह बोदवडच्या गोदामालाही टाळे
मुक्ताईनगरसह तालुक्यातील कुर्‍हा येथील स्वस्त धान्य गोदामात तपासणीच्या धास्तीने बाहेरून बारदानासह धान्य आणले गेल्याचा आरोप खुद्द राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला होता तर राज्यस्तरीय पथकाने दोन्ही गोदामांची तपासणी करून सील लावले होते. पथकाने दोन्हीही ठिकाणची आवक-जावक रजिस्टर, साठा रजिस्टर तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत.

पुरवठा मंत्री गिरीश बापटांच्या ओएसडी यांना पथकाचे रिपोर्टींग
जिल्हाभरात विविध तालुक्यात दाखल झालेले राज्यस्तरीय दक्षता समितीतील नियुक्त अधिकारी आपल्या कामकाजाचे रिपोर्टींग अन्न व पुरवठा नागरी मंत्री गिरीश बापट यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) शेख यांना करीत आहेत व त्यानंतर थेट बापटापर्यंत गैरव्यवहाराची माहिती दिली जात असल्याचे समजते. पथकांनी ठिकठिकाणी गोडावून सील केले आहेत. यानंतर दोषी अधिकार्‍यांचे थेट निलंबन वा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होवू शकतात.

कुर्‍हा येथे गोडावून उघडले
मुक्ताईनगरासह कुर्‍हा येथे धान्याचा अपहार झाल्यानंतर ताळमेळ बसवण्यासाठी बाहेरून धान्य व गोणपाट आणले जात असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केल्यानंतर सोमवारी रात्री कुर्‍हा व मुक्ताईनगर येथील गोदाम राज्यस्तरीय पथकाने सील केले होते तर सहा अधिकार्‍यांच्या पथकाने मंगळवारी पुन्हा कुर्‍हा येथील गोदाम उघडून त्यातील साठ्याची तपासणी सुरू केल्याची माहिती दिली. अधिकार्‍यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला.