भुसावळ– भुसावळसह चाळीसगाव व मुक्ताईनगरातील स्वस्त धान्यातील मापातील पाप प्रकरणी तीनही ठिकाणच्या गोदामपालांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी निलंबित केले आहे. या कारवाईने पुरवठा विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. भुसावळात धान्याचा घोटाळा उघड झाल्यानंतर अखेर गोदामपाल डी.आर.जगताप यांचे निलंबन करण्यात आले असून या काळात त्यांची धरणगाव येथे बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी शासकीय गोदामातील मापातील पाप प्रकरण बाहेर काढत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे तक्रार केली होती तर याचवेळी वरणगाव येथे पाठवण्यात येणारा धान्य साठा सील करण्यात आला होता. मुंबईच्या दक्षता समितीने या धान्य साठ्याची मोजणी केल्यानंतर त्यात 50 क्विंटलमागे एक ते दोन किलो धान्य सरासरी कमी आढळले होते. दरम्यान, मुक्ताईनगरातील गोदामपाल तिवारी तसेच चाळीसगावचे गोदामपाल राजेंद्रसिंग कुर्हेकर यांचेही निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भुसावळातील पुरवठा अधिकारी आर.एल.राठोड यांच्यासह अन्य कोणत्या अधिकार्यांवर काय कारवाई होते? याकडे तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत.