भुसावळ : भुसावळातील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली होती तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही आमदारांनी वाढते अतिक्रमण शहरासाठी घातक असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या प्रकाराची दखल घेत पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटवण्याबाबत दखल घेतली आहे. शहरातील न्यायालयाच्या मागील बाजूला असलेल्या वसंत टॉकीजवरील मार्गावरील चहा, नाश्ता, गॅरेज आदी आठ ते दहा जणांना पालिका प्रशासनाकडून टपर्या 24 तासात उचलण्याचे अल्टीमेटम देण्यात आल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, नोटीसी मिळताच काही व्यावसायीकांनी स्वतःहून दुकाने हटवण्यास सुरूवात केली आहे.
शहरातील सर्वच भागातील अतिक्रमण हटवावे
शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहे त्यामुळे वाहतुकीला त्याचा मोठा अडसर होत असल्याने पालिकेने सर्वच भागातील अतिक्रमण हटवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने सुरूवातीला शहरातील न्यायालयाच्या मागील टपरी धारकांना पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने नोटिसा बजावल्या आहेत. या भागात चहा, नाश्ता, गॅरेज, झेरॉक्स आदींनी दुकाने थाटली आहे. या सर्वांना पालिकेच्या माध्यमातून जागा मोकळी करून देण्यासाठी नोटिसा 16 फेब्रुवारीला पालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहे. सर्वच व्यावसायीकांनी जागाा मोकळी करावी, अन्यथा पालिका प्रशासनाने काढल्यास दंडासहीत वसूल केला जाईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.