भुसावळातील अतिक्रमण हटवले : मुख्याधिकार्‍यांकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागितला

7 रोजी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना उपस्थित राहून सादर करावा लागणार अहवाल

भुसावळ : भुसावळ पालिकेने वर्दळीच्या सर्वच रस्त्यावरील अतिक्रमण 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हटवले होते. पालिकेच्या कारवाईमुळे हातावर पोट भरणारे लोक बेरोजगार झाले असून शेकडो अपंग बांधव, विधवा महिला रस्त्यावर आल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष फिरोज रहेमान शेख यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह वरीष्ठ स्तरावर तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता इतर मागास बहुजन कल्याण व महिला बालविकास राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार स्वयंस्पष्ट अहवालासह उपस्थित राहण्याचे जलसंपदा राज्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी यांनी कळवले आहे. नगरपालिका क्षेत्रातील बेरोजगार व निराधार महिलांसाठी तसेच अपंग व मागासवर्गीय बांधवांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने मंत्रालय दालन क्रमांक 231 मध्ये चर्चा केली जाणार आहे.

पुरेसा वेळ न देताच हटवले अतिक्रमण
शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे गोर-गरीब विधवा, निराधार महिलांसह अपंग व मागासवर्गीय बांधवांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला होता शिवाय व्यावसायीकांना अतिक्रमण काढू देण्यासाठी पुरेसा वेळही न मिळाल्याने त्यांना बेरोजगार करण्यात आले.