भुसावळ : शहरातील एका आयुवेर्दिक औषधालयाबाबत जळगावच्या अन्न व औषध प्रशासनाकड तक्रार आल्यानंतर पथकाने शुक्रवारी दुपारी छापेमारी करीत तीन तास कसून तपासणी केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. आयुर्वेदीक औषधालयातून दिल्या जाणार्या आयुर्वेदीक जडीबुटी औषधात अॅलोपेथीक औषधे मिसळून दिली जात असल्याची तक्रार आल्याने ही तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पथकाला आक्षेपार्ह काहीही आढळले नसलेतरी दोन नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तक्रारीनंतर पथकाने टाकला छापा
भुसावळातील शिव कॉलनीत वैद्य एस.जी.करमंचे यांचे धन्वंतरी आयुर्वेदीक चिकित्सालय व औषधालय आहे. या औषधालयातून आयुर्वेदीक जडीबुटीत अॅलोपेथीक औषधांची भुकटी मिसळून दिली जात असल्याची एक तक्रार जळगाव येथील अन्न व औषध विभागाला प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक ए.एम.माणिकराव, औषधे निरीक्षक एस.बी.मुळे, ग्रामिण व ट्रामा सेंटरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.मयुर चौधरी, आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद जावळे, शहर पोलिस ठाण्याचे एएसआय अनिल चौधरी, महिला पोलिस कॉस्टेबल रुपाली कोलते, तलाठी व्ही.टी.पाटील यांच्या पथकाने छापा टाकला.
दोन औषध नमून्यांची होणार तपासणी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक ए.एम.माणिकराव म्हणाले की, तक्रारीनंतर तीन तास तपासणी करण्यात आली मात्र अॅलोपॅथीकचे औषधे आढळून आली नाहीत मात्र दोन आयुर्वेदीक औषधांचे नमूने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली जाईल व अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल.