20 वर्षानंतरही सुटेना पाण्याची समस्या ; निवडणुकीत मतांचा जोगवा मागणार्या लोकप्रतिनिधींना मात्र आश्वासनांचा सोयीस्कर विसर
; मूलभूत सोयी-सुविधांसह पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेपर्यंत उपोषण न सोडण्याचा उपोषणार्थींचा निर्धार
भुसावळ- शहराला लागून असलेल्या आरएमएस कॉलनीत तब्बल 20 वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांसह पाणीप्रश्न सुटत नसल्याने संतप्त वयोवृद्ध नागरीकांसह महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारपासून उपोषण छेडले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार या नागरीकांनी केला आहे. निवडणुकीत मतांचा जोगवा मागणार्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर मतदारांचा सोयीस्कर विसर पडल्याचा आरोप उपोषणार्थींना केला आहे तर निवडणुकीत मते मिळवण्यासाठी मतदारांची नावे सोयीस्कररीत्या मतदार यादीत टाकण्यात आली मात्र आता सत्ता मिळवल्यानंतर मतदारांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची टिकाही उपोषणार्थींनी केली आहे.
20 वर्षांपासून नागरीक सोसताय हाल
शहराला लागून असलेल्या मात्र पालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या आरएमएस कॉलनीत मोठ्या प्रमाणाव नागरीक राहतात मात्र गेल्या 20 वर्षांपासून या नागरीकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत तर आत सर्वाधिक पाणीप्रश्न या नागरीकांना भेडसावत आहे. पालिका प्रशासन पालिका हद्दीत भाग येत नसल्याचे कारण देत पाणीपुरवठा करत नाही मात्र निवडणूकप्रसंगी लोकप्रतिनिधींनी मते मागून सोयी-सुविधा देवू, असे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भागात रस्ते, गटारी, पथदिवे या मूलभूत सोयी-सुविधांसह आता कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवावी या मागणीसाठी वयोवृद्धांसह महिलांनी पाण्याचे हंडे घेवून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडले आहे.
यांचा उपोषणात सहभाग
अॅड.अश्विनी डोलारे, शोभा दत्तात्रय तायडे, विद्या प्रकाश पाटील, संगीता लोखंडे, लता राजपूत, रेणुका पाटील, श्वेता डोलारे, संगीता राजेंद्र पाटील, कमलबाई गोमटे, आशा चौधरी, वत्सलाबाई भंगाळे, मोरेश्वर नंदा गवळी, काशीनाथ निकम, रत्नाकर जैन, सुधाकर काळे यांच्यासह प्रभागातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत.
आंदोलनानंतर येते सत्ताधार्यांना जाग -दुर्गेश ठाकूर
प्रभागातील नागरीकांनी उपोषणाचा इशारा देताच सत्ताधार्यांना जाग आली व त्यांनी तत्काळ विशेष सर्वसाधारण सभा बोलावली. नागरीक हालचाली करीत असताना सत्ताधार्यांना जाग येणे व हद्दवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठवणे ही बाब दुर्देवी आहे. प्रभागातील नागरीकांना सुविधा मिळत नसतील तर त्यांनी पालिकेचा कर भरावाच कशाला ? असा प्रश्न नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी उपस्थित केला.