भुसावळ (गणेश वाघ) : माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुमारे चार वर्षांपूर्वी भुसावळ पालिकेत सत्तांतर घडून भाजपाकडे एकहाती सत्ता आली. सुमारे तीन महिन्यात शहराचा कायापालट करणार असे आश्वासन खडसेंनी भुसावळकरांना दिल्याने शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या मात्र सत्तांतराच्या चार वर्षानंतरही भुसावळातील उद्यानांची दुरवस्था थांबवण्यात भाजपा सत्ताधार्यांना यश आल्याचे दिसून येत नाही. शहरातील सर्वच उद्यानांची देखरेखीअभावी दुरवस्था झाली असून टारगटांनी उद्यानातील साहित्याची नासधूस केल्याने सुट्टीत चिमुकल्यांनी खेळावे कुठे? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाची दुरवस्था
भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने उभारण्यात आलेले यावल रोडवरील उद्यानाची हल्ली प्रचंड दुरवस्था झाली आहे. कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊननंतर उद्यानाची नियमित देखभाल राखली न गेल्याने उद्यानात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे शिवाय चिमुकल्यांना बसण्यासाठी धड बाके नाहीत की खेळण्यासाठी चांगल्या दर्जाची खेळणी नाहीत ! आबालवृद्धांचीदेखील वेगळी गत नाही. पूर्वी उद्यानात असलेल्या सौरदिव्यांची टारगटांनी नासधूस केल्याने रात्रीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर अंधार असल्याने अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय प्रेमी युगुलांच्या पथ्थ्यावरही ही बाब पडताना दिसून येते.
कारंजा बंद : सर्वत्र वाढले गवत
पालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त 26 जानेवारी 1982 मध्ये उद्यानात कारंजा बसवण्यात आला होता मात्र देखभालीअभावी गेल्या अनेक वर्षांपासून तो बंदावस्थेत आहे. कधी काळी सायंकाळच्या वेळी हा कारंजा सुरू झाल्यानंतर पडणार्या रंगी-बेरंगी प्रकाशामुळे उद्यानात आबालवृद्धांसह चिमुकल्यांची मोठी गर्दी होत होती मात्र उद्यानाच्या दुरवस्थामुळे सार्यांनीच पाठ फिरवली आहे. उद्यानाची निगा राखण्यासाठी कुणाचीही नेमणूक नसल्याने उद्यानात सर्वत्र गवत वाढले आहे शिवाय धुळही मोठ्या प्रमाणावर बसल्याने सहसा उद्यानात कुणी फिरकत नसल्याचे चित्र आहे.
खेळणी नाहीत ; बाकांचाही अभाव
लॉकडाऊनपूर्वी उद्यानात रेल्वे, मिकी माऊस आदी सुविधा नाममात्र दरात चिमुकल्यांना उपलब्ध होत्या मात्र लॉकडाऊन सुरू होताच या सुविधा बंद पडल्या ते आजतागायतही बंदच आहेत. उद्याने खुली करण्याचे आदेश सरकारने दिले असलेतरी उद्यानाची रयाच गेल्याने चिमुकलेही उद्यानाकडे फिरकेनासे झाले आहेत. नाशिक विभागात एकमेव अ वर्ग पालिका भुसावळची असतानाही चिमुकल्यांना येथे खेळण्यासाठी साधी खेळणीदेखील नसल्याचे दुर्दैव भुसावळकरांचे आहे हेदेखील तितकेच खरे ! चिमुकल्यांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोके, सीसॉ, बसण्यासाठी बाके यासह अन्य खेळणी बसवणे काळाची गरज आहे मात्र त्यासाठी सत्ताधार्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.
दानशूरांनी पुढे येण्याची गरज
जळगावातील काव्य रत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यानाचा जैन एरीगेशन कंपनीने ज्या पद्धत्तीने कायापालट करून अधिकाधिक सुविधा नागरीकांना उपलब्ध करून दिलासा दिला त्या पद्धत्तीनेच भुसावळातील दानशूर उद्योजकांसह एखाद्या कंपनी, संस्था आदींनी पुढाकार घेवून उद्यानाची दुर्दशा थांबवावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
माळी पद गोठवले अन् दुर्दशेला सुरूवात
शहरातील उद्यानांची दुरवस्था थांबवण्यासाठी शासनाकडून माळी पदाला मंजुरी होती त्यामुळे उद्यानांची नियमीत देखभाल व दुरूस्ती वेळच्या वेळी होत होती मात्र नंतर शासनाने हे पद गोठवल्याने उद्यानांना उतरती कळा लागली ती आजतागायत कायम आहे. शासनाकडून जरी पद मंजूर नसलेतरी खाजगी तत्वावर सुरक्षा रक्षक तसेच केअर टेकर नेमून उद्यानांची दुरवस्था थांबवता येणे सहज शक्य आहे मात्र त्यासाठी पालिका प्रशासन व सत्ताधार्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
लवकरच उद्याने टाकणार कात : नगराध्यक्ष
शहरातील उद्यानांची दुरवस्था थांबवण्यासंदर्भात पालिका सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावल रोडवरील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान लवकरच कात टाकणार असून टेंडरदेखील मंजूर झाले आहे. लवकरच उद्यानात आकर्षक खेळणी व आबालवृद्धांसाठी अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील शिवाय कंत्राटी तत्वावर केअर टेकर नेमण्यासंदर्भातही दखल घेवू, अशी ग्वाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.