अकोल्यातील उद्योगपती विवेक पारस्करसह ब्रोकर उमेश लाठीविरुद्ध गुन्हा : शेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रांद्वारे फसवले
भुसावळ- शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व नगरसेवक मनोज बियाणी यांना शेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून 90 लाख रुपयात फसवल्याची घटना घडली. या प्रकरणी अकोल्यातील उद्योगपती तथा आरोपी विवेक रामराव पारस्कर (रा.तोष्णिवा ले आऊट, अकोला) व प्रॉपर्टी ब्रोकर उमेश कन्हैय्यालाल लाठी (साई सदन, रणपिसे नगर, अकोला) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
संशय बळावला अन् फसवणूक झाली उघड
संशयीत जमीन आपल्या नावावर करून देत नसल्याने आपला संशय बळावल्यानंतर 27 जुलै 18 रोजी खडका तलाठी कार्यालयात जावून शेत गट क्रमांक 168-169 यांचे उतारे मिळण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर सर्वे नंबर 1 ते 137 असल्याचा दाखला मिळाला व त्यावेळी शेतजमीन सर्वे क्रमांक 168 ही अस्तित्वात नसताना ती असित्वात असल्याचे दाखवून आपली आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपींनी बनावट सही, शिक्क्यांद्वारे शेतजमिनीच्या ईसार्यापावती पोटी 90 लाखांची रक्कम हडपली.
तर संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी
बियाणी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने माझ्यावर सिव्हिल लाईन, अकोल्यात पाच गुन्हे दाखल आहेत, माझ्याकडे गुंड लोक आहेत, तुमच्या कुटुंबाला संपवू, अशी धमकीदेखील दिल्याचे बियाणी यांनी तक्रारीत नमूद केले असून पोलिस माझे वाकडे करू शकत नाही, असेही आरोपींनी म्हटल्याचे नमूद आहे. तपास पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास पवार करीत आहेत.