भुसावळातील एक कोटींचे सोने चोरी प्रकरण : आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध

Without locking Manappuram Bank in Bhusawal, the manager took crores of gold and spread to Bihar भुसावळ : शहरातील पांडुरंग टॉकीजच्या मागील बाजूस असलेल्या मणप्पुरम गोल्ड बँकेतील सुमारे दोन किलो वजनाचे व बाजारमूल्यानुसार एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याच्या दागिण्यांवर बँकेच्या मॅनेजरनेच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरातील बँकेत तारण सोने ठेवलेल्या ग्राहकांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मॅनेजरने चोरी केल्यानंतर बँकेच्या शटरला कुलूप न लावताच रविवारी सकाळी युपीकडे धूम ठोकली तर सोमवारी सकाळी बँक उघडण्यासाठी कर्मचारी आल्यानंतर त्यांना बँकेला कुलूप लावण्यात आले नसल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेतील सोन्याचे ऑडीट करण्यात आले व त्यानंतर दोन किलो 60 ग्रॅम सोने चोरीचा गेल्याची बाब उघडकीस आली.

सुटी असल्याची संधी साधून लांबवले दागिणे
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळातील मणप्पुरम बँकेतर्फे अल्प वेळेत सोने तारण ठेवून ग्राहकांना कर्ज (लोण) दिले जाते तर बँकेचे सुमारे दोन हजार शंभर ग्राहक असून त्यातील अनेकांनी सोने बँकेकडे तारण ठेवत कर्ज घेतले आहे. बँकेने सुमारे दोन महिन्यांपूर्वीच उत्तप्रदेशातील विशाल राय (30, उत्तरप्रदेश) या तरुणाला बँकेच्या मॅनेजरपदी नियुक्त केले होते. बँक मॅनेजर यांच्याकडे बँकेच्या तिजोरीसह बँकेचीदेखील चावी असल्याने त्यांनी रविवार, 20 नोव्हेंबर सुटी असल्याची संधी साधून सकाळी 8.20 ते 8.35 या वेळेत तिजोरीतील दागिण्यांवर डल्ला मारला.

ऑडीटदरम्यान उघडकीस आली घटना
रविवारी बँकेला सुटी असल्याची संधी आरोपी मॅनेजरने साधली. सकाळी 8.20 ते 8.35 या अवघ्या 15 मिनिटात आरोपीने एका लॉकरमधील सोने बॅगेत टाकले व बँकेला कुलूप न लावताच युपीकडे धूम ठोकली. सोमवारी बँक कर्मचारी बँकेत आल्यानंतर त्यांना शटरला कुलूप नसल्याचे जाणवल्याने त्यांनी मॅनेजरशी संपर्क साधला मात्र त्याचा मोबाईल बंद आल्याने संशय बळावला व ऑडीटरकडून सोन्याची पडताळणी करण्यात आल्यानंतर 28 किलो तारण ठेवलेल्या सोन्यापैकी दोन किलो 60 ग्रॅम सोने कमी भरल्याची बँक प्रशासनाला खात्री झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिस प्रशासनाकडे बँकेचे मॅनेजर विशाल राय (30, उत्तरप्रदेश) यांनीच सोने लांबवल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
मण्णपुरम बँकेतील सुमारे एक कोटींचे सोने लांबवल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तुषार पाटील, विजय नेरकर, उमाकांत पाटील, योगेश माळी, प्रशांत सोनार, जावेद शहा आदींनी भेट देत पाहणी केली.