भुसावळातील एटीएम प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती

0

रीजनल मॅनेजरांचा पोलिसांनी नोंदवला जवाब ; कॅश बाहेर काढण्यासाठी चेन्नईचे अधिकारी येणार

भुसावळ- शहरातील वर्दळीच्या जामनेर रस्त्यावरील नवशक्ती आर्केडमधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. ड्रील मशीनसह टीकमने चोरट्यांनी एटीएम मशीनचे नुकसान केले असलेतरी सुदैवाने कॅश ट्रे न उघडल्याने तब्बल आठ लाख 54 हजार 500 रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली होती अन्यथा बँकेला मोठा फटका बसला असता. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्याद्वारे गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. चोरटे जिल्ह्यातील असल्याचा कयास असून सुरूवातीला फिंगर प्रिंटद्वारे गुन्हेगारांना तपासले जात असून अन्य हिस्ट्रीशीटरही पोलिसांच्या रडारवर आहेत.

रीजनल सेल्स मॅनेजरांनी नोंदवला जवाब
रविवारी बँकेचे रीजनल सेल्स मॅनेजर अनुजकुमार यांनी बाजारपेठ पोलिसांचे उपनिरीक्षक व तपासाधिकारी अनिस शेख यांच्याकडे जवाब नोंदवला. चोरट्यांनी एटीएमची तोडफोड केल्याने कॅश ट्रे लॉक झाला असून तो उघडण्यासाठी चेन्नई येथील कंपनीचे अधिकारी लवकरच येणार आहेत. दरम्यान, या प्रकारात एटीएमचे मात्र सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.