भुसावळ : सिगारेटच्या कारणावरून वाद घालत किराणा व्यावसायीकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी रात्री शहरातील शनी मंदिर वॉर्डात घडली होती. या प्रकरणी बाबा काल्यासह शेख रेहानला अटक करण्यात आली होती. आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान गुरुवारी दुपारी बाजारपेठ पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा (गावठी पिस्टल) जप्त करण्यात आला. आरोपीने घोडेपीर बाबा परीसरात एका जागी हा कट्टा लपवून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
कट्टा दाखवून केली होती लूट
रविवारी रात्री व्यापारी दुबे यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून बाबा काल्यासह चौघांनी पलायन केले होते. या प्रकरणी बाबा काल्यासह शेख रेहान यास अटक करण्यात आली होती. आरोपीने गावठी कट्टा लपवल्याची माहिती पोलिसांना चौकशीत दिल्यानंतर गुरुवारी दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, रवींद्र बिर्हाडे, श्रीकृष्णा देशमुख आरोपीला घोडे पीर बाबा दर्गा परीसरात नेवून लपवून ठेवलेल्या जागेवरून कट्टा जप्त केला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.