भुसावळातील क्रीडा संकुलाची गेली रया, अधिकार्‍यांनी केली पाहणी

0

महिनाभरात सार्वजनिक बांधकाम विभाग देणार ताबा

भुसावळ : जुगादेवी रस्त्यावर तब्बल एक कोटी रुपये खर्चून उभारलेल्या क्रीडा संकुलाचा ताबा दोन वर्षानंतरही घेण्यात न आल्याने या क्रीडा संकुलाची रया गेली होती. शुक्रवारी आमदार संजय सावकारे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व अन्य अधिकार्‍यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी केली. महिनाभरात संकुल व आवाराची दुरुस्ती करून द्यावी, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मौर्य यांना केल्या.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलाच नाही
तब्बल दोन वर्षांपासून बांधूनही हस्तांतरण न झालेल्या क्रीडा संकुलाचा ताबा क्रीडा विभागाने घेतलेला नव्हता. या संदर्भात क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांना विचारले असता त्यांनी आपल्याला बांधकाम पूर्ण झाल्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला नसल्याचे त्यांनी सांगितले.