भुसावळातील खड्डेमय रस्त्यांना डांबरीकरणातून मिळणार दिलासा

0

पालिकेची 30 रोजी सभा : महत्त्वपूर्ण विषय सभेच्या अजेंड्यावर

भुसावळ- शहरातील खड्डेमय रस्त्यातून लवकरच शहरवासीयांची सुटका होणार असून पालिकेच्या आगाती सर्वसाधारण सभेत शहरातील रस्त्यांच्या डागडूजीसह महत्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली जाणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले. सुमारे दोन महिन्यांपासून अधिक काळापासून लांबवलेली सर्वसाधारण 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या गोपाळ नगरातील सभागृहात होत आहे.

विविध विषय सभेच्या अजेंड्यावर
21 विषय असलेल्या या सर्वसाधारण सभेत शहरातील महत्वाच्या पाणीप्रश्नी 10 व 12 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्रातील क्लोरिफाक्यरेटरमधील गाळ काढून तो वाहून नेणे, या यंत्रणेवरील पंप, स्टार्टर आदींची दुरुस्ती करणे, म्युनिसीपल हायस्कूल इमारतीवरील कौले काढून टिनपत्रे बसविणे, खड्डे बुजविणे, 2018-19 या वित्तीय वर्षात पथदिवे, ट्यूब, फिचर, सोडीयम, मर्क्युरी, हायमास्ट, पथदिवे दुरुस्ती करून केबल टाकण्याच्या निविदेला मंजुरी देणे यासह विविध कामांच्या अहवालावर चर्चा करणे, अ‍ॅलम खरेदीच्या कामाला कार्योत्तर मंजूरी देणे, जुन्या नगरपालिका इमारतीचा पडावू झालेला भाग काढून टाकणे आदी विषय घेण्यात आले आहे. शहरातील सर्वांत जटील प्रश्न असलेल्या पावसाळ्यात खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर मुरुम – खच तसेच पावसाळी डांबर टाकून खड्डे बुजविणे हा महत्वाचा विषय घेण्यात आला आहे.

ग्रीन स्पेसचा विकास
सर्वसाधारण सभेत पालिका हद्दीतील गणेश कॉलनी भगातील नियोजीत ग्रिन स्पेसच्या भागात नाल्यालगत गटार व रिटेनिंग वॉल बांधणे, टीपी क्रमांक एकवरील ग्रिन स्पेसच्या जागेत फेन्सींग करणे आदी विषय घेण्यात आले आहे. प्रत्यक्षात ग्रीन स्पेस विकसीत करण्यासाठी यापूर्वी ही कामे होणे अपेक्षीत आहेत. यामुळे या कामांना अधिक महत्व देण्यात आले आहे.

नियमित सभा होणार -नगराध्यक्ष
तांत्रिक अडचणीमुळे दोन महिन्यानंतर सभा होत असलीतरी यापुढे दर महिन्याला पालिकेची सर्वसाधारण सभा होणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. शहरातील महत्त्वपूर्ण विषयांना प्राधान्य देण्यात आले असून त्यात शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे ते म्हणाले.