भुसावळ : हद्दपार असताना आदेशाचे उल्लंघण करून शहरात आलेल्या माजी नगरसेवक राजकुमार रवींद्र खरात व राजन उर्फ गोलू रवींद्र खरात (समता नगर, भुसावळ) यांना मंगळवारी शहर पोलिसांनी अटक केली होती. बुधवारी संशयीताना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.व्ही.जंगमस्वामी यांनी 29 जुलैपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेण्यापूर्वीच संशयीतांनी पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणत धक्काबुक्की केली होती तर खरात रजनी खरात यांनादेखील या प्रकरणात पोलिसांनी आरोपी करीत त्यांच्याविरोधातही शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीत खरात बंधू सोमवारी उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाल्याने मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली व बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयीत आरोपींतर्फे अॅड.सत्यनारायण पाल तर सरकार पक्षातर्फे अॅड.ए.ए.चुकेवाढ यांनी बाजू मांडली. तपास उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.