भुसावळातील गांजा प्रकरण : जामिनावर सुटताच आरोपीने केला पुन्हा गुन्हा
धुळ्यातील पसार संशयीतांचा कसून शोध : सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
भुसावळ : शहरात चारचाकीतून होणारी गांजाची तस्करी बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी पहाटे उधळत दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या तर दोन संशयीत पसार झाले होते. पसार झालेल्यांपैकी एक संशयीत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सोनगीर पोलिसात गांजा प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच संशयीताला जामीन मिळाला मात्र पुन्हा त्याने तेच उद्योग सुरू केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, भुसावळातील पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेल्या दोघा संशयीताचा पोलिस पथकाने धुळ्यात शोध घेतला मात्र संशयीत पसार झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
नाकाबंदीदरम्यान संशयीत अडकले जाळ्यात
बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री उशिरा नाकाबंदी केल्यानंतर वाहनांची तपासणी सुरू केली असताना स्वीप्ट (एम.एच. 01 बी.टी.6682) आल्यानंतर त्यातील प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात 33 किलो गांजा आढळला होता. या प्रकरणी स्वीप्ट चालक विजय वसंत ठिवरे (46, घर क्रमांक 105, मिरजकर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व नंदकिशोर हिरामण गवळी (28, रा.पवन नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यांना अटक करण्यात यश आले तर दोन संशयीतांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत बसस्थानकातून पळ काढला होता. दरम्यान, गुरुवारी दोघा आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मनमाडऐवजी भुसावळात आले अन् जाळ्यात अडकले
समजलेल्या माहितीनुसार, तीनही संशयीतांनी धुळ्याहून मनमाड गाठले व तेथून शिर्डीत जावून दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात धुळ्याहून दहा रुपये किलोप्रमाणे भाड्याने कार मनमाडपर्यंत बोलावण्यात आले. यावेळी गांजा मनमाड येथे घेवून धुळ्यात जाण्याचे संशयीतांचे नियोजन होते मात्र काही कारणास्तव मनमाड ऐवजी भुसावळात गांजा घेण्याचे ठरले व संशयीत मनमाडहून चारचाकी घेवून भुसावळात धडकले. रेल्वे स्थानकातून त्यांनी एका संशयीताकडून गांजा स्वीकारला व स्टेशनबाहेर पडताच नाकाबंदी अडकले.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
बाजारपेठ पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाईपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. संशयीत स्थानकात शिरताना व बाहेर निघताना त्यात स्पष्टपणे दिसत आहे. लोहमार्ग व सुरक्षा बलाच्या कार्यक्षमतेबाबतही या प्रकारामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येते. आरोपींनी सीसीटीव्हीच्या कव्हरेज क्षेत्राबाहेरून गांजा स्वीकारल्याची शक्यता आहे त्यामुळे गांजा देणारा संशयीत, पुरवठादार व खरेदीदार यांची मोठी साखळी पोलिस तपासात उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहेत.