भुसावळातील गुंडगिरीचे उच्चाटन गरजेचे
भुसावळात पालकमंत्री गुलाबराव पाटील : सहा कोटी 22 लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
भुसावळ : भुसावळात शहरात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून त्याचे उच्चाटन होणे अत्यंत गरजेचे आहे. बंदुक, कट्टे घेवून लोक फिरत असून त्याबाबत बंदोबस्त होणे गरजेचे आहे शिवाय भुसावळात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांवर हात उचलणारे लोक असल्याने त्यांना वठणीवर आणणे गरजेचे असून भुसावळ शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण आयपीएस दर्जाचा अधिकार्याची मागणी केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली. शहरात सहा कोटी 22 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ शनिवारी त्यांच्याहस्ते शहरातील श्रीनगर, जामनेर रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर तसेच डी.एस.हायस्कूलमध्ये झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
भुसावळसाठी 58 कोटींची कामे मंजूर
गुलाबराव पाटील म्हणाले की, पालकमंत्री हा एका तालुक्याचा नसून संपूर्ण जिल्ह्याचा असल्याने जवाबदारी अधिक वाढली असून जळगाव जिल्हा विकासाचा जिल्हा व्हावा यासाठी आपले अधिक प्रयत्न आहे. भुसावळ शहराच्या विकासासाठी आतापर्यंत 58 कोटींचा निधी दिला असून त्यातून आता कामांना सुरूवात झाली आहे. या शहरात केवळ शिवसेनेचा एकच नगरसेवक आहे मात्र निधी देताना कधीही हात आखडता घेतलेला नाही, असेही गुलाबराव म्हणाले. जळगाव शहरासाठी सव्वाशे कोटी देणारा पहिला पालकमंत्री मी असल्याचेही ते म्हणाले.
तर कुणाची आघाडी सांगू शकत नाही !
निवडणुकीपुरता राजकारण व्हायला हवे, या मताचा मी असल्याचे पालकमंत्री म्हणाले. आज व्यासपीठावर बसलेले विविध पक्षांचे असलेतरी उद्या ते कोणत्या पक्षात असतील वा आघाडी करतील, हे सांगता येत नाही, असे सूचक संकेतही त्यांनी दिले. आमचे भाजपाशी लव्ह मॅरेज होते मात्र नंतर ब्रेकअप झाला मात्र असे झाले म्हणून भाजपाच्या आमदारांच्या मागण्यांबाबत दखल घेतली नाही, असे केले नाही उलट त्यांना भरभरून निधी दिला, असेही ते म्हणाले.
एक कोटींच्या वाहनांची खरेदी करणार
पोलिस दलाकडून चांगल्या कामाची अपेक्षा करताना त्यांना सुविधा चांगल्या मिळायला हव्यात त्यामुळे अलिकडेच नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली व आता पुन्हा नव्याने एक कोटींच्या वाहनांची खरेदी करण्यात येईल व प्रांताधिकारी, तहसीलदार व डीवायएसपी यांना नवीन वाहने देवू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, चारशे फुटात पोलिस कर्मचारी वास्तव्य करीत आहे मात्र यापुढे पोलिसांसाठी टू बीएचके प्लॅट दिला जात असून चोपडा व जामनेरात तशा पोलिस कॉलन्यांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भुसावळसह जळगावसाठी 11 कोटीतून सीसीटीव्ही बसवण्यात येत असून त्यामुळे गुंडांना वठणीवर आणण्यासाठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
म्हणून आता ‘ओम पुरीचा गाल पकडला’
धरणगावात हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते केल्याचे विधान बोदवडमधील एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली व तोच धागा पकडून पालकमंत्र्यांनी भुसावळातील कार्यक्रमातही माध्यमांकडून झालेल्या टिकेची माहिती देत सांगितले की, रस्ता कामे केल्यासंदर्भात तो संदर्भ होता, कुणाचेही मन दुखवण्याचा आपले विचार नव्हता मात्र खराब रस्त्यांसाठी आता ओम पुरीचा गाल पकडला असून किमान आतातरी त्यावर टिका होवू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.
रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी अतिक्रमण हटवावे : आमदार सावकारे
शहरात सर्रास पिस्तुल निघत असलेतरी पोलिस अधिकारी चांगले आल्याने त्यांच्यावर कारवाईदेखील होत आहे मात्र शहराच्या राजकारणातही गुन्हेगारी वाढली असून त्यासही ब्रेक लागणे गरजेचे असल्याची भावना आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केली. ते म्हणाले की, शहरातील सर्वदूर अतिक्रमण वाढले असून मुख्य रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत त्यामुळे शहराचा नावलौकीकही त्यामुळे खराब होत असून आता प्रशासकीय राजवट असल्याने कुणाचाही राजकीय दबाव नसल्याने मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशासक व मुख्याधिकार्यांनी दखल घ्यावी, असे आमदार म्हणाले. शहराचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे सांगून आमदार म्हणाले की, आता शहर विकासाची शहरवासीयांना अपेक्षा आहे त्यासाठी नागरीकांनी चांगल्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची जवाबदारी आहे. अमृत योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याबाबत बैठक लावावी, अशी विनंती त्यांनी पालकमंत्र्यांना केली. पालकमंत्री पक्ष भेद न करता कामे करीत असून खर्या अर्थाने ते पालकमंत्री असल्याचा गौरवही त्यांनी केला.
रस्त्यावर खुर्ची टाकून बसलो म्हणजे आपणच काम केले नव्हे !
जामनेर रस्त्याचे काम नाशिकच्या कंपनीला मिळालेले असून ई टेंडर प्रक्रियेनुसार लोव्हेस्ट निविदा त्यांनी भरल्याने त्यांना काम मिळाले आहे मात्र काही लोक खुर्ची टाकून तेथे बसून, आम्हीच काम केले असे दाखवत असतील तर ते चुकीचे असल्याचा टोला आमदार सावकारे यांनी कुणाचेही नाव न घेता हाणला. ते म्हणाले की, आपण स्वतः या रस्त्याचे काम होण्यासंदर्भात पत्र पालकमंत्र्यांना दिले होते व त्याबाबत डीपीडीसीत पाठपुरावा केल्यानंतर हे काम मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
लोक प्रशासक राजवट हवी म्हणताय : आमदारांनी काढला चिमटा
शहरात आता चांगली कामे होत असल्यानेच शहरात प्रशासकच हवा, असे लोक म्हणत आहे मात्र नागरीक असे बोलत असतील तर आपण कामे केलेली नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे, असा टोला तत्कालीन सत्ताधार्यांचे नाव न घेता आमदार संजय सावकारे यांनी श्रीनगरातील कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासमोरच हाणला. आमदार सावकारे म्हणाले की, पक्ष भेद न करता कामे व्हावीत ही भावना लोकप्रतिनिधींची असली पाहिजे. लोकांनी आपल्याला लोकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, स्वतःच्या विकासासाठी (वैयक्तिक गोष्टीसाठी) नाही, असे आमदारांनी सांगून खळबळ उडवून दिली. पक्ष भेद बाजूला ठेवून शहराचा विकास झाला पाहिजे मात्र गेल्या 20 ते 25 वर्षांपासून शहराचा विकास झालेला नाही, असेही आमदार म्हणाले.