जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले : गणेशोत्सव मंडळाची बैठक
भुसावळ : भुसावळातील वाढलेली गुन्हेगारी ठेचण्यासाठी पोलिस दलाकडून आता सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी रविवारी दुपारी दोन वाजता शहरातील अहिल्या देवी कन्या विद्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत केले. शहरातील समस्यांचे निराकरण करण्याची त्यांनी ग्वाही देत समस्यांबाबत मुख्याधिकारी व जिल्हाधिकार्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. नागरीक हे पोलिसांचे डोळे व कान असल्याने नागरीकांनी सहकार्य करावे, असे सांगता त्यांनी भुसावळातील गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याचे सांगितले. शहरातील भाईंचे लागलेले पोस्टर्स व त्यांच्या समर्थकांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी सांगून या पोस्टर्सबाबत पालिकेची परवानगी घेतली आहे वा नाही ? हे तपासून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासह त्यांची संख्या वाढवण्यात येईल शिवाय विसर्जन मार्गावर दुकाने असलेल्या व्यापार्यांनी सीसीटीव्हीची दिशा मिरवणूक दिसेल, अशा पद्धत्तीने करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर डॉ.अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार महेंद्र पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रस्तावना डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले.
खराब रस्त्यांसह समस्यांचा नागरीकांनी वाचला पाढा
नगरसेवक प्रा.दिनेश राठी यांनी भजे गल्लीत मद्यपींचा उपद्रव असल्याने तेथे बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली. नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच छेडखानी वाढल्याचे सांगितले. प्रशांत वैष्णव यांनी पथदिवे बंद असून हायमास्ट बंद असल्याचे सांगितले तर सुनील ठाकूर यांनी दिवसाढवळ्या पथदिवे सुरू असतात रात्री मात्र बंद असतात असे सांगून कॉलेज, क्लासबाहेर रोडरोमिओंचा त्रास वाढल्याचे ते म्हणाले शिवाय गुन्हेगारी वाढल्याची तक्रार त्यांनी केली. प्रा.धीरज पाटील यांनी पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केली.
आमदार म्हणाले गुन्हेगारांशी पोलिसांचे संबंध
आमदार संजय सावकारे यांनी शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली तसेच उंची कमी असलेल्या गणेश मूर्ती बसवण्याचे व पूरग्रस्तांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले. भुसावळ पोलिस दलातील काही पोलिसांचे अद्यापही गुन्हेगारांशी संबंध असून अशा कर्मचार्यांच्या बदलीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. सण उत्सव आनंदात साजरे करावे मात्र उत्सवात पोलिसांचे संरक्षण घेणे ही बाब चुकीची असल्याचे त्यांनी सांगत पोलिसांचा आदर करावा, असेही आवाहन केले.
छेडखानी रोखण्यासाठी दामिनी पथक
अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के म्हणाल्या की, सण सणासारखा साजरा करा, आनंददायी वातावरणात सण साजरा होण्याची गरज आहे. भुसावळात आल्यानंतर पोलिसांबद्दल तक्रारी ऐकायला मिळाल्या त्यामुळे कॉलेज आवारात यापुढे दामिनी पथक नियुक्त करण्यात येईल शिवाय गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पोलिस ठाण्याबाहेर पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांचे नंबर यापुढे ठळक अक्षरात पोलिस ठाण्याबाहेर लावणार असल्याचे त्यांनी सांगत पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले शिवाय कायदा हातात घेणार्यांची गय करणार नसल्याचा इशारा दिला.
शहराचा नावलौकीक वाढवा -जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे म्हणाले की, उत्सवात सण साजरे करा, पथदिवे, रस्ते या दरवर्षाच्या समस्या आहेत. भाईगिरी करू नका, शहराचे नाव खराब होवू देवू नको मात्र शहराचा नावलौकीक वाढवण्याासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी करीत शहराच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगितले.