भुसावळ : शहरात जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास लागत नसतानाच शहरातील गोपाळ नगरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ नगरातील रहिवासी व शिक्षक राजेंद्र अशोक कोल्हे (46) हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बुधवार, 13 रोजी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान कुलूप तोडून घरातील कपाटातून 61 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी शहर पोलिसात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा घरफोडीने खळबळ
भुसावळ शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक राजेंद्र अशोक कोल्हे (46, प्लॉट नंबर 11, गोपाळ नगर, भुसावळ) हे बुधवार, 13 जुलै रोजी कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधत भर दिवसा घराला लावलेले कुलूप तोडत आत प्रवेश केला व कपाटातून 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचा तार आदी मिळून 60 हजार 900 किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सायंकाळी सहा काम आटोपून शिक्षक राजेंद्र कोल्हे घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघउकीस आले. त्यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय सोनवणे करीत आहे.